सांगली : गगनचुंबी ताबूतांच्या भेटीने कडेगावचा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मोहरम शनिवारी संपन्न झाला. शहरातील सुरेशबाबा देशमुख चौकामध्ये ताबूत भेटीचा सोहळा पाहण्यासाठी जमलेल्या हजारो आबालवृध्दांच्या गर्दीने दुला-दुला व मौला अलि झिंदाबादचा गजर यावेळी केला. मोहरमनिमित्त सोहोली, निमसोड व शिवाजीनगर येथील मानकर्‍यांनी आज सकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात ताबूतांची पूजा केली.त्यानंतर दुपारी बारा वाजता  सातभाईंचा मानाचा ताबूत उचलण्यात आला. त्यानंतर ताबूत भेटीच्या सोहळ्याला प्रारंभ झाला.

हेही वाचा >>> “संभाजी भिडे दरवेळी वादग्रस्त वक्तव्ये करतात, त्यामुळे मी एकनाथ शिंदेंना…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

साडेबारा वाजता बागवान यांचा ताबूत उचलण्यात आला. या दोन्ही तांबूतांची पटेल चौकात दुपारी एक वाजता भेट झाली. हे ताबूत मिरवणुकीने मुख्य भेटीच्या ठिकाणी निघाले असता वाटेत शेटे,आत्तार,देशपांडे,हकीम,तांबोळी यांचेही ताबूत मिरवणुकीत सहभागी झाले.त्यानंतर येथील सुरेशबाबा देशमुख चौकात शेख, इनामदार तसेच सुतार यांचे उंच ताबूत व मजूदमाता ताबूतही दाखल झाले. देशमुख, शिंदे, शेटे, देशपांडे, कुलकर्णी आदी मानकर्‍यांनी पंजे भेटीच्या ठिकाणी आणले.यावेळी बुधवार पेठ मेल व शुक्रवारी पेठ मेल यांच्यात नाथपंथीय गीतांचे सामने झाले. तसेच राष्ट्रीय एकात्मतेची गीते गायली गेली. मानकर्‍यांनी तांबुतांची पूजन केल्यानंतर दुपारी दोन वाजता राज्यासह कर्नाटक सीमाभागातून आलेल्या भाविकांच्या अलोट उत्साहात आणि ’दुला दुला’ व ’मौला अली झिंदाबाद’ च्या जयघोषात येथे मोहरम निमित्त मानाप्रमाणे सर्व तांबूतांच्या भेटींचा सोहळा संपन्न झाला. बागवान यांचा ताबूत जागेवर पोहोचल्यावर आजच्या या सोहळ्याची सांगता झाली.

हेही वाचा >>> पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांच्या साथीदारास रत्नागिरीतून अटक; एटीएसकडून आतापर्यंत चारजण अटकेत

यावेळी आमदार डॉ.विश्वजित कदम, आ. अरुण लाड, माजी आ. मोहनराव कदम, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिह देशमुख, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, जितेश कदम ,नगराध्यक्ष धनंजय देशमुख, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आदींसह तहसिलदार अजित शेलार, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम आदी मान्यवर व नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यांचेसह हिंदू-मुस्लिम बांधव,भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Story img Loader