उद्योगपती मुकेश अंबानी यांनी शनिवारी (२४ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीसाठी खुद्द मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गेले होते. या द्वयींमध्ये साधारण एक ते दीड तास चर्चा झाली असून बैठकीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याआधी उद्योगपती गौतम अदानी यांनी बुधवारी (२० सप्टेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
हेही वाचा >>> कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी रात्री उशिरा भेट घेतली. या बैठकीबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र रात्री १२.१५ वाजता अंबानी कुटुंबीय वर्षा बंगल्यावरून बाहेर पडले. मुकेश अंबानी यांच्यासोबत अनंत अंबानीदेखील असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानी यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हो अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र बुधवारी (२० सप्टेंबर) रोजी उद्योगपती गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे राजकीय विरोधक असलेल्या एकनाथ शिंदे यांची मुकेश अंबानी यांनी भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा >>>“आदित्य ठाकरेंची अवस्था म्हणजे बैल गेला अन्…” गोपीचंद पडळकरांची खोचक टीका
उद्धव ठाकेर-गौतम अदानी यांच्यात बैठक
काही दिवसांपूर्वी गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली होती. अदानी आणि ठाकरे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे म्हटले जाते. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना धारावीच्या पुनर्विकासासाठी काही बैठका घेण्यात आल्या होत्या. या पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी उद्योग समूहाचे नाव चर्चेत होते. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर सध्या राज्यात शिंदे गट-भाजपा सरकार अस्तित्वात आहे. ठाकरेंकडे सध्या सत्ता नसतानाही गौतम अदानी यांनी त्यांची घेतलेली भेट घेतली होती. याच कारणामुळे ही भेट चर्चेचा विषय ठरला होता.