December Installment Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्या काळात सुरू राहील की नाही? याबाबत मोठी चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोपही झाल्याचं पाहायला मिळालं. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा करण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ जारी करून माहिती दिली आहे. याशिवाय, आदिती तटकरेंनी आधीच्या लाभार्थी महिलांच्या यादीत आता नव्या १२ लाख महिलांचा समावेश होणार असल्याचंही सांगितलं आहे.
काय आहे लाडकी बहीण योजना हप्ता ट्रान्सफरचं नियोजन?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागण्याआधीच म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने राज्यात लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे म्हणजेच ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले होते. त्यामुळे निवडणुकांची पूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर व राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर फक्त डिसेंबरचा हप्ता येणं शिल्लक होतं. त्यानुसार सत्ता स्थापन केल्यानंतर लगेच लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं.
नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योडनेचा डिसेंबरचा हप्ता येत्या आठवड्याभरात जमा केला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. “डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात आजपासून सुरू होत आहे. साधारणपणे ९ ऑक्टोबरला आपण शेवटचं वितरण केलं होतं. तेव्हा जवळपास २ कोटी ३४ लाखहून अधिक महिलांना आपण या योजनेचा लाभ दिला होता”, अशी माहिती आदिती तटकरेंनी बुधवारी जारी केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.
नव्या लाभार्थी महिलांचा समावेश
दरम्यान, या व्हिडीओमध्ये आदिती तटकरेंनी लाभार्थी महिलांमध्ये जवळपास १२ लाख नव्या महिलांचा समावेश होणार असल्याचीही माहिती दिली. “आज डिसेंबरअखेर हप्त्याचं वितरण करत असताना यात २ कोटी ३४ लाख महिलांचा समावेश आहेच. पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे (आधार कार्ड लिंक करणे) लाभापासून वंचित राहावं लागत होतं, त्यातल्याही ज्यांचं आधार सीडिंग झालंय, त्या लाभार्थी महिलांना सन्माननिधीच्या वितरणाची सुरुवात आपण करत आहोत”, असं त्या म्हणाल्या.
Ladki Bahin scheme : ६७ लाख ‘लाडक्या बहिणीं’ च्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा
“येत्या ४ ते ५ दिवसांत टप्प्याटप्प्याने आपण हे वितरण करणार आहोत. आज साधारणपणे आधार सीडिंग नव्याने झालेल्या १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभाची सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ६७ लाखांहून जास्त महिलांना आज हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. असंच उद्या, परवा आणि पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल. आपल्याला लाडक्या बहीण योजनेचा लाभ राज्याच्या तीन लाडक्या भावांच्या माध्यमातून मिळत आहे. पण या निधीचा आपल्या उद्योगधंद्यांसाठी, आरोग्यासाठी, कुटुंबासाठी, स्वत:साठी योग्य तो वापर करावा”, असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे.