March Installment Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्चच्या पूर्वसंध्येला पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची मोठी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. जानेवारीचा हप्ता मिळाल्यानंतर अनेक पात्र महिला फेब्रुवारीच्या हप्त्याकडे लक्ष ठेवून होत्या. मात्र, महिना संपून दुसरा महिना उजाडला तरीही फेब्रुवारीचा हप्ता खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीवर आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं असून मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबतही सुतोवाच केले आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्या विधानभवनात आलेल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार असल्याची माहिती दिल्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आदिती तटकरे यांना विचारण्यात आला. त्यावर आदिती तटकरे म्हणाल्या, “फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यात जमा करणार आहोत. मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विभागाच्या वतीने निधी उपलब्ध केला जाईल; निधी उपलब्ध झाल्यानंतर हप्ता दिला जाईल.
मार्च महिन्यात किती रुपये मिळणार?
विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना २१०० रुपये देणार असल्याचं आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आलं होतं. त्यानुसार महायुती सरकार सत्तेत बसल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपयांची प्रतिक्षा होती. मात्र त्यानंतरही १५०० रुपयेच खात्यात आल्याने महिलांनी याबाबत सरकारला प्रश्न विचारला. त्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत प्रस्ताव मांडल्यानंतर महिलांना २१०० रुपये दिले जातील, असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. त्यामुळे महिलांना मार्च महिन्यात किती रुपये मिळणार याबाबत आदिती तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर आदिती तटकरे म्हणारे, “साधारणपणे (वाढीव निधीबाबत) योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. महिला व बालविकास खात्यात निधी येतो. तो निधी महिलांच्या खात्यात पोहोचवणं, ती यंत्रणा अधिक सक्षम करणं याकडे विभागाचं लक्ष केंद्रित आहे.”