मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ठरत असेलेला चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना मारहाण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून हा चित्रपट गेल्या काही दिवसापासून सतत या ना त्या कारणाने चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातच आता चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना काही अज्ञातांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या पौड येथील कार्यालयामध्ये काही अज्ञातांनी प्रवेश करत कार्यालयाची तोडफोड करुन प्रवीण तरडे यांना धक्काबुक्की केली. मात्र मला कोणतीही मारहाण झाली नसून मी ठिक असल्याची प्रतिक्रिया प्रवीण तरडे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिली.

‘मी पौडमधील माझ्या कार्यालयामध्ये असताना आमच्या मुळशी गावातील काही अज्ञात मुलांनी माझ्या कार्यालयात प्रवेश केला आणि कार्यालयाची तोडफोड केली. मात्र मला कोणतीही मारहाण करण्यात आली नसून केवळ धक्काबुक्की झाली आहे. पण मी ठिक आहे’, असं प्रवीण तरडे म्हणाले.

पुढे ते असंही म्हणाले, ‘मुळशी पॅटर्न हा चित्रपट एखाद्या गुन्हेगाराच्या जीवनावर चित्रीत करण्यात आल्याचा समज काही अज्ञात व्यक्तींना झाला होता. त्यामुळे त्यांनी कार्यालयात येऊन हा धुमाकूळ घातला. मात्र या अज्ञातांचा जो काही  गैरसमज होता तो मी दूर केला आहे. माझ्या मुळशी पॅटर्न या चित्रपटामध्ये शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आली आहे.

दरम्यान, तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून देखील या घटनेचा खुलासा केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र तरडे यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी पोहचले असून आधिक तपास करण्यात येत आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mulshi pattern director pravin tarade beaten hardly in pune
Show comments