नव्यानेच निर्माण झालेल्या देवरुख आणि गुहागर नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये बहुरंगी लढती अटळ असल्याचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. या दोन्ही नगर पंचायतींची निवडणूक येत्या ३१ मार्च रोजी होत असून, त्यासाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अखरेची मुदत होती. देवरुख नगर पंचायतीच्या निवडणुकीतील १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ७० जण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. या नगर पंचायतीच्या एकूण १७ जागांपैकी फक्त दोन जागांवर सरळ लढती असून उरलेल्या १५ जागांसाठी तीन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अट्टहासामुळे येथे कॉंग्रेसशी आघाडी होऊ शकलेली नाही. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये सर्वत्र मैत्रीपूर्ण लढती आहेत. भाजप-सेना युतीने मात्र जागा वाटपात समझोता केला आहे. संगमेश्वर तालुक्यात प्रबळ असलेल्या बहुजन विकास आघाडी आणि कुणबी सेना या दोन्ही संघटना राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आहेत. त्यामुळे निवडणुकीचे चित्र गुंतागुंतीचे झाले आहे.
गुहागर नगर पंचायतीच्या निवडणुकीत आजअखेर सात जणांनी माघार घेतल्यामुळे १७ जागांसाठी एकूण ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांच्या या मतदारसंघातही कॉंग्रेसशी आघाडी होऊ शकलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्व जागा लढवत असून, तीन ठिकाणी त्यांची कॉंग्रेसच्या उमेदवारांबरोबर मैत्रीपूर्ण लढत आहे. भाजप-सेना युतीने मात्र येथेही जागांबाबत समझोता करण्यात यश मिळवले आहे. १७ जागांपैकी भाजप १५, तर सेना २ ठिकाणी निवडणूक लढवत आहे. याव्यतिरिक्त कॉंग्रेसचे ३, मनसेचे ४ आणि आरपीआयचा १ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र मुख्य लढत अपेक्षेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्येच आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या तडजोडीत हा मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेने स्वत:कडे घेतला. त्यामुळे मावळते आमदार डॉ. विनय नातू यांनी बंडखोरी केली. त्याची परिणती शिवसेनेचे मातब्बर नेते रामदास कदम यांच्या पराभवात झाली आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव या मतदारसंघातून सहज विजयी झाले. आता डॉ. नातू पुन्हा भाजपतर्फे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा