मुंबई : देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांची भाषणे, महत्त्वाचे शासकीय कार्यक्रम, भारतीय संस्कृतीचा प्रचार करणारे साहित्य ते इफ्फी या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवणारे भारतीय चित्रपट, भारतीय संगीत यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘ॲमेझॉन इंडिया’शी बहुउद्देशीय करार केला आहे. या करारानुसार ‘ॲमेझॉन इंडिया’च्या विविध माध्यमांद्वारे ‘भारतीय आशय’ मोठय़ा प्रमाणावर प्रसारित करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत ‘ॲमेझॉन इंडिया’शी नुकताच दिल्लीत एका कार्यक्रमात मनोरंजन, माध्यम क्षेत्रातील भारतीय आशयाच्या प्रचार-प्रसाराच्या दृष्टीने बहुउद्देशीय करार करण्यात आला. त्यानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणारे सर्व कार्यक्रम, सोहळे, विविध चित्रपट-नाटय़ प्रशिक्षण संस्था आणि अन्य उपक्रम ‘ॲमेझॉन इंडिया’च्या ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, ॲलेक्सा, ॲमेझॉन म्युझिक, ॲमेझॉन इ-कॉमर्स आदी व्यासपीठांवरून प्रसिद्ध केले जाणार आहेत.

भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार करणारी पुस्तके यांचा एक विशेष विभाग यापुढे ॲमेझॉन ई कॉमसर्वंर उपलब्ध होणार आहे. ‘ओटीटी’वरून सर्जनशील अभिव्यक्तीच्या नावाखाली राजरोसपणे अश्लीलता आणि शिवीगाळ यांचा प्रचार करणाऱ्यांवर अंकुश लावला जाणार असल्याचा इशाराही अनुराग ठाकूर यांनी याच कार्यक्रमात दिला. तसेच ‘ॲमेझॉन इंडिया’च्या प्राईम व्हिडिओ या ओटीटी आणि अन्य विविध माध्यमांतून जास्तीत जास्त शासकीय कार्यक्रमांचे प्रसारण करण्याच्या करारावरही त्यांनी स्वाक्षरी केली.

‘इफ्फी’तील निवडक चित्रपट ‘प्राईम’वर..

ऑस्कर वा गोल्डन ग्लोबसारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवडले गेलेले चित्रपट नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ या ‘ओटीटी’वर दाखवले जातात. त्याच धर्तीवर ‘इफ्फी’तील विजेते भारतीय चित्रपट, भारत आणि अन्य देशांच्या सहाकार्याने काढलेले चित्रपट आणि विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळय़ात विजेते ठरलेले भारतीय चित्रपटही प्राईम व्हिडिओवर दाखवले जाणार आहेत. प्रसार भारती आणि एनएफडीसी यांच्याकडील संग्रहित चित्रपट, माहितीपट आणि भारतीय कलाकारांविषयीची माहिती जगभरात पोहोचवण्यासाठीही अॅमेझॉन ‘एनएफडीसी’बरोबर काम करणार आहे.

एफटीआयआय, एसआरएफटीआयच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या ‘फिल्म ॲण्ड टेलीव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) आणि ‘सत्यजित रे फिल्म ॲण्ड टेलीव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’(एसआरएफटीआय) या दोन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कामाची संधी, नामांकित चित्रपटकर्मीच्या कार्यशाळा अशा विविध माध्यमातून ॲमेझॉन प्राईम व्हिडिओकडून सहकार्य करण्यात येणार आहे.

‘मन की बात’ ॲलेक्सावर

देशी-विदेशी गाणी ऐकवणाऱ्या ‘ॲमेझॉन म्युझिक’ आणि ‘ॲलेक्सा’वर आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भाषणेही ऐकवली जाणार आहेत. याशिवाय, महत्त्वाचे शासकीय कार्यक्रम-सोहळे, सामाजिक उपक्रम यांची माहिती आणि रोजच्या बातम्याही ॲमेझॉन म्युझिकवरून प्रसारित करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रमही प्रसारित केला जाणार आहे

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Multi purpose agreement of ministry of information and broadcasting for dissemination of indian content regarding ad amazon india amy