नियोजनाचा अभाव; कार्यकर्त्यांचा संताप उद्या मुंबईमध्ये महामेळावा

रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका भाजपच्या मुंबईला पक्षाच्या महामेळाव्यासाठी जाणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना बसला. सकाळपासून विशेष गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांना सहा तास रेल्वे फलाटावर घालवावे लागले. त्यामुळे आधीच उकाडय़ाने असहय्य झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेत्यांवर संताप व्यक्त केला. लाखो रुपये खर्च करून ठरवण्यात आलेली विशेष रेल्वे  सकाळी केवळ १७ ते १८ कार्यकर्त्यांना घेऊन निघाली व योग्य निरोप न मिळाल्यामुळे उशिरा स्थानकावर आलेले शेकडो कार्यकर्ते मागेच राहिले. पक्षाच्या या घोळामुळे १०० पेक्षा जास्त कार्यकर्ते आल्या पावली रेल्वेस्थानकावरून परत गेले.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाचा उद्या मुंबईमध्ये महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी नागपूर शहरातून आणि ग्रामीण भागातून प्रत्येकी पाच हजार कार्यकर्ते जाणार होते. पक्षाने त्यासाठी विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था केली होती. नागपूरवरून सुटणारी गाडी १० वाजता अजनी रेल्वेस्थानकावरून निघणार होती आणि जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांसाठी गाडी १२ वाजता मुख्य स्थानकावरून सुटणार होती. त्याप्रमाणे शहरातील आणि जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात आला होता. शहरातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह दोन ते अडीच हजार कार्यकर्ते पदाधिकारी सकाळी १० वाजेपर्यंत अजनी रेल्वेस्थानकावर एक एक करीत पोहचले. मात्र, पक्षाने ठरवलेली विशेष गाडी त्यापूर्वीच सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी केवळ १७ प्रवासी घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याची

माहिती कार्यकर्त्यांना मिळाली. आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार मोहन मते, महामंत्री भोजराज डुबे, माजी महापौर प्रवीण दटके, पक्षाचे संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर आदी पक्षाचे वरिष्ठ नेते या गाडीने जाणार होते. रेल्वे विभागाची चूक असली तरी या घोळामुळे भाजयुमोच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नियोजनशून्य कारभाराचा समाचार घेत नेत्यांवर संताप व्यक्त केला. सकाळी उत्साहात आलेले कार्यकर्ते प्रतीक्षेत उकाडय़ाने हैराण झाले होते. सकाळपासून आलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या विशेष गाडीची प्रतीक्षा करण्यासाठी सहा तास फलाटावर थांबावे लागले आणि अखेर दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी अजनी रेल्वेस्थानकावरून गाडी मुंबईकडे रवाना झाली.

मुख्यालयातून वेळापत्रक बदलले

भाजपच्या मुंबईतील मेळाव्यासाठी विदर्भातून सहा विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या. नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानक, अजनी, भंडारा, गोंदिया, बल्लारशहा आणि वर्धा विशेष गाडय़ा सोडण्याचे निश्चित झाले होते. मात्र, मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने अजनी येथून सकाळी साडेदहा वाजता विशेष गाडी सोडण्याचे ठरल्यावर ऐनवेळी सकाळी सात वाजून ५० मिनिटांनी सोडण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना लघुसंदेशाद्वारे कळवण्यात आले, परंतु हा संदेश भाजपच्या कार्यकर्त्यांपर्यंत योग्यवेळी पोहोचला नाही. कार्यकर्ते आधी कळवण्यात आलेल्या वेळेवर स्थानकावर पोहोचले आणि गाडी सकाळी निघून गेल्याचे समजल्यावर गोंधळ घालू लागले. दरम्यान, वेळेत बदल झालेल्या विशेष गाडीत केवळ २० प्रवासी बसले. ही गाडी वर्धेला थांबवून ठेवण्यात आली आणि नंतर ती गाडी वर्धा येथूना १३.२६ वाजता मुंबईकडे रवाना करण्यात आली  होती. मध्यवर्ती स्थानकावरून दुपारी ३.३८ वाजता विशेष गाडी सोडण्यात आली. अजनी स्थानकावरून दुसऱ्यांदा ३.२५ वाजता सोडण्यात आली. बल्लारशहा येथून सकाळी ९.५८ ला गाडी सोडण्यात आली. गोंदिया येथून निघालेली विशेष गाडी नागपूरहून साडेअकरा वाजता आणि  भंडारा येथून निघालेली गाडी सकाळी साडेबारा वाजता निघाली. रेल्वेचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस.जी. राव म्हणाले, मुख्यालयातून अजनी निघणाऱ्या गाडीचे वेळापत्रकात बदल करण्यात आले. त्यासंदर्भात आम्ही संबंधितांना कळवले होते. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पुन्हा अजनी येथून गाडी सोडण्यात आली.

फलाटावरच जेवण 

महामेळ्याला जाण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी दोन वेळेच्या जेवणाचा डबा घेऊन यावा, अशी सूचना करण्यात आल्यामुळे हजारो महिला आणि युवा कार्यकर्त्यांनी डबे आणले होते. सकाळी ९ वाजता घरून निघालेल्या कार्यकर्त्यांना रेल्वे फलाटावर गाडीची प्रतीक्षा करावी लागल्याने अनेकांनी घरून आणलेले डबे फलाटावरच फस्त केले. पाण्याचे पाऊच, बॉटल संपल्याचे लक्षात आल्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी धावाधाव करीत पुन्हा पाच हजार पाण्याचे पाऊच बोलावले. गाडीत भूक लागेल म्हणून दोन हजार चिवडय़ांचे पाकिटे आणली.

कार्यकर्त्यांकडून नियमांची पायमल्ली 

सहा तास रेल्वे फलटावर भाजप कार्यकर्त्यांना गाडीची प्रतीक्षा करावी लागली असताना त्यात काही उतावीळ कार्यकर्त्यांनी रेल्वे पोलिसांच्या देखत नियमांची पालमल्ली केली. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी जिने असताना पक्षातील कार्यकर्त्यांनी थेट रुळावरून पाण्याचे पॉकेट असलेले पोते घेऊन जात होते. शिवाय सामानाची ने आण सुद्धा पलाटावरुन केली जात होती. एरवी प्रवाशांना नियमांचे पालन करा असा उपदेश करणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते हा प्रकार पाहत होते. माध्यमांचे प्रतिनिधी याचे चित्रण करीत असल्याचे लक्षात येताच हा प्रकार थांबवला. रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे रूळ ओलांडणे गुन्हा आहे आणि त्यासाठी एरव्ही सामान्य नागरिकावर रेल्वे पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र फलाटावर पोलीस उपस्थित असताना भाजपच्या कार्यकर्त्यांवर कुठलीही कारवाई केली नाही.

रेल्वे विभागाकडून घोळ

रेल्वे विभागाने सकाळी १० वाजता विशेष गाडी येणार असल्याचे पक्षाच्या कार्यालयात कळवले होते. त्याप्रमाणे शहरातील कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ऐनवेळेवर रेल्वे विभागाने काय घोळ केला, त्यामुळे गाडी सकाळी ८ वाजता रेल्वेस्थानकावर आली आणि ८ वाजून ५० मिनिटांनी सोडण्यात आली. भाजपचे कार्यकर्ते रेल्वेस्थानकावर दिसत नाही हे सुद्धा विभागाने बघितले नाही. गाडी सोडताना रेल्वेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी पक्षाच्या नेत्यांना कळवले नाही. रेल्वे विभागाच्या चुकीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना गाडीची प्रतीक्षा करत मानसिक त्रास सहन करावा लागला. रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराची रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे.

कृष्णा खोपडे, आमदार, भाजप