मुंबईतील भाजपा मेळाव्यात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी महाभारतातील युद्धाचा दाखला देत राज्यातील राजकीय परिस्थिती उलगडून सांगितली. “महाभारत बदलत चाललं आहे, देवेंद्ररुपी कृष्णाने कर्णरुपी एकनाथाला युद्धातून बाजूला काढले” असे म्हणत शेलारांनी शिवसेनेला चिमटा काढला. भ्रष्ट्राचाराविरोधातील या लढाईत कृष्ण आणि कर्ण हे दोघेही आमच्या सोबत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये भाजपाचा महापौर आता कोणीही थांबवू शकत नाही, असा दृढ विश्वास शेलार यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाची सत्ता येईल, असे शेलार यावेळी म्हणाले. ४५ हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई पालिकेवर सत्ता असतानाही शिवसेनेनं मुंबईकरांना सेवा पुरवल्या नाहीत, असा आरोप शेलारांनी केला.
“आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला!
दरम्यान, या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर तुफान फटकेबाजी केली. “आपण सर्वांनी कालची मुंबई पाहिली का? तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच संस्कृती दिसून आली. पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं, हे आपण सगळ्यांनी बघितलं. काल दहिहंडी जोरात होती. आता गणपती, नवरात्र असे सर्व उत्सव जोरात करायचे आहेत. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत”, असा अप्रत्यक्ष टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडत नसल्याची टीका भाजपाकडून करण्यात येत होती.
“फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू”, आशिष शेलारांची भाजपाच्या मेळाव्यात डायलॉगबाजी!
राज्यात शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकासआघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर, शिंदे गट आणि भाजपाने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. या सत्तानाट्यावर शिवसेनेकडून बरीच टीका करण्यात आली होती. एकनाथ शिंदेच्या सोबत आमदारांचा एक मोठा गट शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला आहे.