मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमरावतीच्या खासदार नवणीत राणा यांना अटक करण्यात आलं होतं. सध्या त्यांची सुटका करण्यात आली आहे. मात्र अटकेदरम्यान पोलिसांनी अमानुष वागणूक दिली असा आरोप नवणीत राणा यांनी केलेला आहे. राजकीय हेतू समोर ठेवून राणा यांना अटक करण्यात आलं होतं, असाही आरोप केला जातोय. याच प्रश्नाला आता मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी नवणीत राणा यांना राजकीय हेतू समोर ठेवून अटक करण्यात आलं नव्हतं, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.
हेही वाचा >> “…तर तुमचा जीव घेऊ”, खासदार नवनीत राणा यांना धमक्या; दिल्लीत तक्रार दाखल!
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आभासी माध्यमाद्वारे मुंबईकरांसोबत थेट संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी नवणीत राणा यांच्या अटकेबाबत माहिती दिली. “नवणीत राणा यांच्या अटकेचा निर्णय हा पूर्णपणे मुंबई पोलिसांचा होता. अटक करण्याचा निर्णय हा पोलिसांकडूनच घेतला जातो. राणा यांना अटक करण्यास राजकीय व्यक्तींकडून सांगण्यात आले नाही. मुंबई पोलिसांच्या बाबतीत आपल्याला तेवढं समाधान असलं पाहिजे. आम्ही प्रोफेशनल काम करतो,” असे संजय पांडे म्हणाले.
हेही वाचा >> राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संजय राऊतांनी घेतली शरद पवार यांची भेट; म्हणाले ‘त्यांचे आशीर्वाद…’
नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केली होती. त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. परिणामी राणा दाम्पत्याला २२ एप्रिल रोजी पोलिसांनी मुंबईतील त्यांच्या खार येथील निवासस्थानावरून अटक केलं होतं. त्यानंतर त्यांना तुरूंगातही जावे लागले होते. नंतर जामिनावर सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अटक प्रकरणानंतर मुंबई पोलीस तसेच राज्य सरकारवर टीका करण्यात येत होती.