भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेवर सट्टा लावणाऱ्या बुकींविरोधात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने कारवाई सुरु केली आहे. यात बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या मेव्हण्यालाही पोलिसांनी अटक केली असून संबंधित अभिनेताही पोलिसांच्या रडारवर असल्याचे समजते. अमित अजित गिल याला पोलिसांनी अटक केली आहे. अमित गिलनेही काही चित्रपटांमध्ये काम केल्याचे वृत्त आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांनी बुकींविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. वांद्रे क्राईम ब्रँचने गेल्या महिन्यात सहा बुकींना अटक केली होती. अमित अजित गिल यातील एका बुकीच्या संपर्कात होता अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली. यानुसार पोलिसांनी अमित गिललाही अटक केली.

वांद्रे पोलिसांनी अटक केलेल्या बुकींनी सट्टेबाजीसाठी सॉफ्टवेअर तयार केल्याचे समोर येत आहे. याचे सर्व्हर हॉलंडमध्ये होते. याचे भाडे देण्यासाठी बुकी मोठी रक्कम मोजत होते. हा सर्व खटाटोप त्यांनी पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी केला होता. पोलीस कारवाई झाली आणि लॅपटॉप जप्त झाले तरी पोलिसांच्या हाती ठोस पुरावे येणार नाही. सॉफ्टवेअरसाठी प्रत्येकवेळी कोड वापरावा लागत होता. त्यामुळे लॅपटॉपवरुन माहिती मिळणे कठीण होते. तर सर्व्हर परदेशात असल्याने त्यावरुनही माहिती मिळवता येणार नाही असे या बुकींना वाटत होते. मात्र मुंबई पोलिसांनी कसून चौकशी केल्याने बुकींचे हे मोठे रॅकेट उघडकीस आले. ठाण्यातील एका तरुणाने बोरिवलीतीत आशिष शर्माकडून हे सॉफ्टवेअर विकत घेतले होते. यानंतर हे सॉफ्टवेअर अन्य बुकींना देण्यात आले.

अमित गिलच्या अटकेनंतर संबंधीत अभिनेताही पोलिसांच्या रडारवर आहे. गरज वाटल्यास त्याचीदेखील चौकशी केली होऊ शकते असे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. अमित गिलला न्यायालयाने ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Story img Loader