राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या मुंबई क्रूझ पार्टी आणि ड्रग प्रकरणावरुन जोरदार गदारोळ सुरू आहे. तर, भाजपाच्या आदेशावरुन एनसीबी कारवाई करत असल्याचे आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केलेला आहे. एनसीबीकडून क्रूझवर करण्यात आलेली कारवाई ही बनावट असून भाजपाचे काही पदाधिकारी यात सहभागी होते असा आरोप मलिक यांनी केला आहे. त्याचबरोबर ताब्यात घेतलेल्या व्यक्तींपैकी तिघांना सोडून देण्यात आलेलं आहे. त्यातला एक व्यक्ती भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा आहे, असा दावा मलिकांनी केला व त्या भाजपा पदाधिकाऱ्याचं नाव देखील त्यांनी जाहीर केलं. या सर्व घडामोडींवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

“मी मागे देखील बोललो की नवाब मलिकांचं दुखणं वेगळं आहे आणि म्हणून त्या संदर्भात मी पुन्हा बोलणार नाही.” असं फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं.

तसेच, “एनसीबीने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे. ज्यांना त्यांनी एकत्रितपणे नेलं होतं, त्या सर्वांची तपासणी केली गेली, मोबाईल तपासले गेले. त्यानंतर त्यांच्यापैकी जे निर्दोष होते त्यांना सोडण्यात आलं आणि ज्यांच्याकडे काही मिळालं. ज्यांच्या मोबाइल मेसेजेसमध्ये काही आढळलं, अशांना अटक केली गेली.” असं फडणवीस म्हणाले.

Cruise Drug Case: नवाब मलिकांनी जाहीर केलं ‘त्या’ भाजपा पदाधिकाऱ्याचं नाव, म्हणाले…

याचबरोबर, “आता हे जे ड्रग्जचं प्रकरण आहे, एकप्रकारे आपल्या समाजाला खराब करत आहे, आपल्या मुलांना बिघडवत आहे. याचं राजकारण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. तसं तर ज्या लोकांना सोडलं गेलं, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या देखील एका मोठ्या नेत्याच्या मुलाशी जुडलेला व्यक्ती त्याला देखील सोडलं आहे. परंतु, आम्ही यासाठी त्यांचं नाव घेत नाही कारण ते निर्दोष होते. मग त्यांचं नाव घेऊन आम्ही त्यांना बदनाम का करावं? मला वाटतं यावर राजकारण व्हायला नको. आपल्या मुलांना बिघडणारे हे जे ड्रग्जचं व्यसन आहे. याविरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं मला वाटतं. ” असं देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

Story img Loader