परशुराम घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बुधवारपासून (२४ ऑगस्ट) २४ तास सुरु ठेवण्यात येणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिला आहे. कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्गाच्या पेण (रायगड) आणि रत्नागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय, पोलीस विभाग आणि परिवहन विभागाने या घाटामध्ये वाहनांची वाहतुक सुरक्षितरित्या करण्याबाबत आवश्यक उपाययोजना संयुक्तपणे करुन त्यांच्या निरीक्षणाखाली ही वाहतूक चालू राहील, असेही आदेशात म्हटले आहे.
वाहतुकीला परवानगी देत असताना प्रशासनाने अटी शर्ती लागू केल्या आहेत –
१. घाटातील दरडप्रवण क्षेत्रात रात्रीच्या वेळेत पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्यात यावी . २. ठेकेदार कंपनीकडून घाटात नियमितपणे गस्त ठेवण्यात यावी. तसेच त्या वाहनांचा वाहन क्रमांक आणि गस्त घालणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक घाटात दर्शनी भागात माहितीसाठी लावण्यात यावेत.
३. दरडप्रवण क्षेत्रात जेसीबी , क्रेन , पोकलेन अशा अत्यावश्यक सेवा २४ तास उपलब्ध ठेवाव्यात.
४. नेमण्यात येणाऱ्या बंदोबस्ताच्या ठिकाणी ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी उपलब्ध ठेवावेत. त्यांचे संपर्क क्रमांक घाटातील मुख्य नियंत्रण कक्षासह घाटातील दर्शनी भागात माहितीसाठी लावण्यात यावा. ५. दरडप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी धोकादर्शक फलक लावण्यात यावेत.
६. दरडप्रवण क्षेत्रात मुंबई , पुणे महामार्गावर असलेल्या कुंपणाप्रमाणे कुंपण करणे आवश्यक आहे.
७. घाटामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि संरक्षक भिंती बांधणे आवश्यक आहे. ८) बंदोबस्ताच्या ठिकाणी मंडप , पाणी , प्रकाश व जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी. ९. रेड अलर्ट किंवा अतिवृष्टीच्या वेळी घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा व पर्यायी मार्गाने वळवण्याबाबतचा निर्णय संबंधित उपविभागीय अधिकारी , उपविभागीय पोलीस अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी संयुक्तपणे घ्यावा.
अवजड वाहनांना महामार्गावर बंदी
दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांची मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून येत्या २७ ऑगस्टपासून या मार्गावरील वाळू, रेती व तत्सम गौण खनिजांच्या वाहतुकीला पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पनवेल ते सावंतवाडी या राष्ट्रीय महामार्गावर वाळू, रेती भरलेले ट्रक, मोठे ट्रेलर्स आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली आहे. मात्र दूध, पेट्रोल-डिझेल, गॅस, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, भाजीपाला इत्यादी जीवानावश्यक वस्तुंच्या वाहतुकीला यातून वगळण्यात आले आहे, असे आदेशामध्ये नमूद केले आहे.