Odisha Train Accident : कोकण मार्गावरील वंदे भारत या एक्स्प्रेसचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार होते. परंतु, ओडिशात झालेल्या भीषण अपघातानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. न्यूज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
देशभर वंदे भारतचे जाळे विस्तारत जात आहेत. कोकण रेल्वे मार्गावरही मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या एक्स्प्रेसमुळे कोकणात अल्पावधीत पोहोचता येणार आहे. कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसंच, तेजस एक्स्प्रेसलाही मोठा प्रतिसाद मिळाल्याने वंदे भारतही आता सुरू करण्यात येणार आहे. आज वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवण्यात येणार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी दृकश्राव्य माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. तर, मडगाव रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता.
परंतु, ओडिशात तीन ट्रेन एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २३८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ९०० प्रवासी जखमी असल्याचे वृत्त आहे. या भीषण अपघातामुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच, ओडिशामध्येही एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज होणारा वंदे भारत एक्स्प्रेस लोकार्पणाचा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
हेही वाचा >> Train Tragedy : ओडिशातील नागरिकांच्या माणुसकीला सलाम, आवाहन करताच रुग्णालयांमध्ये रक्तदानासाठी रांगा
मंत्री, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांसह सर्व वरिष्ठ अधिकारी ओडिशातील अपघातस्थळी पोहोचले आहेत. त्यामुळे आज नियोजित असलेला वंदे भारत लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने न्यूज १८ ला दिली आहे.