मुंबईचे माजी पोलीस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आज आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. आयटी अधिकाऱ्यांनी करचुकवेगिरीप्रकरणी मुंबईतील अंधेरी भागातील प्रदीप शर्मा यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. प्रदीप शर्मा यांना याआधी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
२५ फेब्रुवारी २०२१ रोजी जिलेटिनने भरलेली एक चारचाकी अँटिलियाजवळ सापडली होती. तर ५ मार्च रोजी या चारचाकीचा मालक मनसुख हिरेन ठाण्याच्या खाडीत मृतावस्थेत आढळला. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) हा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून तपास हाती घेतलाय. तपासाअंती जून २०२१ मध्ये प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजेचाही हात असल्याचं समोर आलं होतं.
शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्याबरोबरच आयटी अधिकाऱ्यांनी माजी खासदार रमेश दुबे आणि त्यांच्या रिअल इस्टेट डेव्हलपर मुलाच्या निवासस्थानाचीही झडती घेतली. रमेश दुबे हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी खासदार आहेत.