करोनाच्या २ वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मागील १० दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. जड अंतकरणाने भक्तांनी लालबाग राजाला निरोप दिला. तब्बल २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.

हेही वाचा- “नवीन व्याख्येप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाही, तर…”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य

गणेशभक्त भावूक

समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात आली. खास सजावट करण्यात आलेल्या तराफ्यावरून थाटामाटात लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात रवाना झाली. खोल समुद्रात बाप्पाला निरोप देण्यात आला. १० दिवसांसाठी घरातील वातावरण प्रफुल्लित करणारा, घराघरात आनंद आणणारा गणपती बाप्पा आपल्या गावी निघाला. पण यावेळी गणेशभक्त भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा- “आमच्या सरकारमध्ये हिंमत होती, रात्री २ वाजता…”, देवेंद्र फडणवीसांचं महाविकास आघाडीवर टीकास्र!

चौपाटीवर अलोट गर्दी

पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन घेत आणि आपल्या बाप्पाचं साजिरं रुप डोळ्यात साठवत लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. दरवर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटीपासून, नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी चौपाटीवर अलोट गर्दी लोटली होती. यांत्रिक तराफ्याच्या सहाय्यानं लालबागच्या राजाला खोल समुद्रात निरोप दिला गेला.

Story img Loader