Mumbai Local Update : कल्याण रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री ८.५५ वाजता टिटवाळा-सीएसएमटी लोकलचा एक डबा रूळावरून घसरला होता. यामध्ये कोणीही प्रवासी जखमी झालेला नाही. घसरलेला डबा सुस्थितीत करून रेल्वे मार्ग मोकळा करण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. त्यानुसार, रात्री १२.४० मिनिटांनी घसरलेला डबा रुळांवरून बाहेर काढण्यात आला, अशी माहिती मध्ये रेल्वेच्या मुंबई विभागाने एक्स पोस्टद्वारे दिली आहे. डबा रुळांवरून काढलेला असला तरीही अद्यापही मध्य रेल्वे उशिराने धावत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन वरून टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याण दिशेकडील गार्डचा डबा रूळावरून घसरला. रूळावरून डबा घसरल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे प्रवाशांमध्ये काही वेळ घबराट पसरली. थोड्या वेळाने रूळावरून डबा घसरल्याचे प्रवाशांना समजले.

या घटनेमुळे कर्जत, कसाराकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या, कल्याणकडे येणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले. कल्याणकडे येणाऱ्या काही लोकल डोंबिवली, ठाकुर्ली दिशेने खोळंबल्या. बराच उशीर लोकल सुरू होत नसल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे मार्गातून प्रवास करून ठाकुर्ली, कल्याण रेल्वे स्थानके गाठणे पसंत केले. तर काही लोकल शहाड, विठ्ठलवाडी भागात खोळंबल्या. ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडला. त्यामुळे लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

हेही वाचा >> कल्याण रेल्वे स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

४० ते ५० मिनिटे लोकल सेवा उशिराने

दरम्यान, मध्यरात्री रेल्वे रुळांवर डबे हटवण्यात आले. परंतु, तरीही लोकल सेवा अद्यापविस्कळीतच आहे. ठाण्यापलीकडे सातत्याने लोकल सेवा विलंबाने होत असते. त्यामुळे नोकरदारवर्गाचे मोठे हाल होतात. त्यातच अशा घटना घडल्या की रुळांवर चालत जाण्यापलिकडे त्यांच्याकडे पर्याय नसतो. आज सकाळपासूनही रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नेटिझन्सने एक्सवर तक्रारींचा पाऊस पाडला. तर, मुंबईलोकलचं वेळापत्रक पुरवाणाऱ्या एम इंडिकेटरच्या चॅटबॉक्समध्येही अनेकांनी रेल्वे सेवा विलंबानी सुरू असल्याच्या तक्रारी दिल्या आहेत. या लोकल जवळपास ४० ते ५० मिनिटांनी उशिराने धावत असल्याच्या तक्रारी काही प्रवाशांनी केल्या आहेत.

त्यामुळे, अशा घटना टाळण्याकरता सरकारने आता योग्य पावलं उचलली पाहिजेत, अशी मागणी जोर धरतेय. वाढत्या गर्दीमुळे अनेकांचे प्राण जात आहेत. त्यातच लोकलसेवेला विलंब होत असल्याने नोकरदारवर्गाला सातत्याने कार्यालयात हाल्फ डे लावावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local update kalyan train derailed and services restored sgk