वर्सोवा- घाटकोपर दरम्यान येत्या जानेवारी महिन्यात मेट्रो धावू लागले अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी विधानभेत लेखी उत्तरात दिली आहे. मात्र, प्रदीर्घ काळ रखडलेल्या या प्रकल्पाचा खर्च २३६५ कोटींवरुन तब्बल ४३२१ कोटींच्या घरात गेला आहे.
रखडलेल्या आणि मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो प्रकल्पाबाबत गणपत गायकवाड, बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे आदींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मेट्रोचा खर्च वाढल्याची कबुली दिली. खासगीकरणातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची मूळ किंमत २३५६ कोटी होती. मात्र, हा मार्ग जास्त वर्दळीच्या भागातून जात असल्याने त्याच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या. डेपोसाठी लागणारी जागा, प्रकल्पग्रस्तांचा विरोध, धार्मकि स्थळांचे स्थलांतर, रेल्वेच्या परवानग्या आदींमुळे या प्रकल्पाला विलंब लागला असून परिणामी त्याचा खर्च ४३२१ कोटींच्या घरात गेला आहे. त्यामुळे तिकीट दर वाढवून द्यावा अशी मागणी हा प्रकल्प राबवणाऱ्या रिलायन्स कंपनीने केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून राबवण्यात येणारी एसआरए प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांवर कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. एसआरएकडून देण्यात आलेल्या मान्यतेपैकी ४२१ प्रकल्प गेली दोन ते आठ वर्षांंपासून रखडलेले आहेत.

Story img Loader