बहुचर्चित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत आहे. औरंगाबादमध्येही शेतकऱ्यांच्या विरोधाची धार वाढली आहे. जमिनीची मोजणी करण्यास विरोध करत औरंगाबाद जिल्ह्यातील कच्चीघाटी शिवारात एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरीक असल्याने मोठा अनर्थ टळला.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांमार्फत ठिकठिकाणी जमीन मोजणीचे काम सुरू आहे. नाशिकमध्येही जमीन मोजणीला विरोध होत आहे. औरंगाबादमधील शेतकऱ्यांनीही जमीन मोजणीला विरोध केला आहे. सहमतीशिवाय जमीन मोजणी केली जात असल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील कच्चीघाटी शिवारात शेख कालू या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पळशी आणि कच्चीघाटी शिवारात दोन दिवसांपासून जमीन मोजणीचे काम सुरू आहे. भाकप आणि विरोधी कृति समितीने मोजणीला विरोध केला आहे. पळशी शिवारात त्यांनी निदर्शने केली. कच्चीघाटी शिवारात मोजणी काम सुरू होते. त्याचवेळी बागायती जमीन असलेल्या शेख कालू या शेतकऱ्याने मोजणीस विरोध केला. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यांनी काम सुरूच ठेवले. संतप्त झालेल्या शेख यांनी कीटक नाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नागरिकांनी रोखल्याने अनर्थ टळला. दरम्यान, प्रचंड पोलीस बंदोबस्तात समृद्धी महामार्गासाठी जमीन मोजणीचे काम सुरू आहे. महामार्गामध्ये आपलीही जमीन जाणार या भीतीने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.