राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीय व्यक्तींवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. यामुळे अजित पवार यांना लक्ष केले जात आहे का? अशी चर्चा सुरू असून त्यांच्या समर्थनात आज पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मावळमध्ये राष्ट्रवादीच्यावतीने उर्से टोल नाका येथे आंदोलन करत रास्ता रोको करण्यात आला आहे. यावेळी अर्धा तास द्रुतगती मार्ग अडवून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय आणि नातेवाईकांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. आज देखील ही कारवाई सुरू असून अद्याप अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त केली नाही. महाराष्ट्रात राजकीय तर्कवितर्क लावण्यात येत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. आज देखील मावळमध्ये राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी उर्से टोल नाका येथे रास्ता रोको करत आंदोलन केले आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. टोल नाका येथे रास्ता रोको केल्याने अर्धा तास पुणे आणि मुंबई या दोन्ही दिशेने वाहनांच्या रंगाच रांगा लागल्या होत्या. दरम्यान, काही मिनिटांनी रस्ता मोकळा करण्यात आला.

पवारांनीही लगावला टोला
एखाद्या व्यक्तीविषयी शंका आल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार तपास यंत्रणांना आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी छापे टाकण्याचा प्रकार म्हणजे अधिकाराचा गैरवापर आहे. उत्तर प्रदेशातील हिंसाचारानंतर मी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या रागातून सत्ताधाऱ्यांनी ही कारवाई केली असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही असं मत शरद पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गुरुवारी व्यक्त केलं. तपास यंत्रणांचा गैरवापर आणखी किती काळ सहन करायचा, हे आता नागरिकांनी ठरवावे असंही पवार म्हणालेत.

उत्तरप्रदेशात शेतक ऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्यानंतर मी या प्रकाराची तुलना जालियानवाला बागेतील हत्याकांडाशी केली. त्या प्रतिक्रियेमुळे सत्ताधाऱ्यांना राग आल्याने त्यांनी अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली असावी, असे त्यांनी नमूद केले. तपास यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवर छापे टाकणे, हा प्रकार म्हणजे अधिकारांचा अतिरेक आहे, अशा शब्दांमध्ये पवारांनी नाराजी व्यक्त केली.