खालापूर टोलनाक्यावरील महत्त्वाच्या दुरुस्तीकामांसाठी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारा द्रुतगती मार्ग दुपारी १२ ते २ या वेळेत बंद ठेवला जाणार आहे. अवजड वाहने दुपारी १२ ते २ या वेळेत पूर्ण रोखली जाणार असल्याने दुपारी दोननंतरच्या वाहतुकीवर त्यांचा मोठा ताण येणार आहे. त्यामुळे गुरुवार हा कोंडीवारच ठरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने येथील काम केले जाणार असून, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरू केली जाईल, अशी माहिती रायगडचे वाहतूक पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे यांनी दिली.

होणार काय?

या महामार्गावरील कोंडी किंवा अपघात यांची तातडीने माहिती व्हावी आणि त्यानंतर वाहतूक नियमन करणे सोपे जावे, यासाठी ‘गुगल मॅप’च्या धर्तीवर यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या यंत्रणेसाठी खालापूर टोलनाक्यावर गर्डर टाकण्यात येणार असून, इतरही दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पर्यायी मार्ग कोणता? 

या कालावधीत या मार्गावर लहान वाहनांची वाहतूक शेडुंगमार्गे जुन्या मुंबई-पुणे मार्गावर वळवण्यात येणार असून अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार असल्याने पुण्याच्या दिशेने दुपारचा प्रवास हा कोंडीचा होण्याची भीती आहे.