Maharashtra News Updates : राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवव्यात, आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. तर, आता सायंकाळी पाच वाजता मुळशी धरणातून ५ ते ७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.
पुण्यातील पूरस्थिती अटोक्यात आली नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एकता नगर परिसरात आढावा घेतला. यावेळी नागरिकांनी येथील अडणचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचून दाखवला.
तर, दुसरीकडे मुंबईतही पावसाने चांगलाच जोर धरला असून मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. परिणामी कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत गुरुवारी मोठी वाढ झाली. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बदलापुरातून उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहत होती. बदलापुरात १६.५० मीटर ही इशारा पातळी आहे. तर १७.५० मीटर ही धोका पातळी आहे.
हेही वाचा >> मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, वाऱ्यांचा वेगही वाढणार
केंद्रीय यंत्रणांकडून अटक टाळायची असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित यांच्यावरील आरोपांच्या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकल्याचा सनसनाटी आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. तसंच, या शपथपत्रांसाठी देशमुखांवर दबाव टाकल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक प्रा. श्याम मानव यांनी केला होता. यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी पाहूयात.
Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊयात.
मध्यंतरी या जमिनीवर वन विभागाचे नाव लागले होते. ही जमिन सोसायटी सदस्यांच्या वारसांच्या वहिवाटीत होती.
महापूराची धास्ती मनात असताना नदीतील पाणी पातळीबाबतची माहिती देत असताना महापालिकेच्या अधिकार्यांचा गलथान कारभार गुरूवारी समोर आला.
सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील खंडाळीसारख्या गावात महिला बचत गटात तृतीय पंथीयांना सामावून घेण्यात आले आहे.
पश्चिम घाटमाथ्यांसह कोयना पाणलोटक्षेत्रात सलग नऊ दिवसांच्या मुसळधार पावसाने कृष्णा, कोयना व पंचगंगा नद्यांकाठी दैना उडवली.
खोट्या भविष्यवाण्यामध्ये फसू नका असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती यांनी अलिबाग येथे महिला सन्मान यात्रे दरम्यान केले.
सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इकडे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.
पीडित ३० वर्षीय महिलेच्या पतीने रितेशला उसने म्हणून ५०० रुपये दिले होते.
पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता असून आयर्विन पूलाजवळ ३५ फूटापर्यंत पातळी जाउ शकेल असा कयास आहे.
शेगाववरून अकोल्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला गुरुवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर आग लागल्याची घटना घडली.
केवळ १२ दिवसांत तब्बल चार लाखावर विद्यार्थ्यांना एसटीने शाळा- महाविद्यालयात जाऊन पास वितरित केले आहेत.
कोल्हापूर : राधानगरी धरणाची पाणीपातळी वाढल्याने सकाळी १ दरवाजा उघडण्यात आला होता. तर सायंकाळी ४ वाजता आणखी ४ दरवाजे उघडले आहेत. ५ दरवाज्यांतून ७१४० तर विद्युत विमोचकातून १५०० असा ८६४० क्युसेक विसर्ग भोगावती नदीत सोडला जात असल्याने या नदीसह पंचगंगा नदीच्या पूरपातळीत वाढ होत आहे.
पुणे : राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (२६ जुलै) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेतील २६ जुलै रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलिस शिपाई संवर्गातील ६६६ तर, चालक पोलिस शिपाई संवर्गातील २० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील वणी शहरातील शास्त्री नगर येथील एका कुटुंबातील बाप लेकास सापाने दंश केला.
अपराध करणारी व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याला कठोर शिक्षा करणाऱ्या राजमाता जिजाऊंचे माहेर शिवबांचे आजोळ असलेला बुलढाणा जिल्हा आज पुन्हा हादरला!
वरची धरणं भरली तर खडकवासलाचं पाणी आणखी वाढणार आहे. १० हजार क्युसेकपासून पाणी सोडायला सुरुवात केली. १० ते ३५ हजार क्युसेकपर्यंत नेलं. नंतर पुन्हा १५ हजार क्युसेक पाणी सोडलं.
३५ क्युसेक पाणी सोडलं असलं तरीही पुण्यात ५ इंच पाऊस झाला. ओढ्या नाल्याने वाहतं, नदीला जे जातं ते गेलं नाही. त्यामुळे ते दाबलं गेलं. म्हणून पाण्याची पातळी वाढली. पाऊस पडला नसता तर पाणी साचलं नसतं. मी मगाशीच सांगितलं होतं पाणी वाढणार होतं.
अजित पवारांकडून एकता नगर येथील पूरस्थितीचा आढावा घेतला जातोय.
पंचनामे करायला सांगितले आहेत, १०-१५ दुकाने ८०-८५ घरे असतील. पंचनामे केली जातील. त्यांना राज्य सरकार आणि पालिकेकडून मदत केली जाईल. गणपती मंदिराच्या मागे कोथरुडचा भाग आहे. तिथं भराव झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे पाणी इथं दाबलं जातंय, असं नागरिकांचं म्हणणं आहे. पूर्वी खडकवासलाचं पाणी सोडलं गेलं तरी पाणी येत नव्हतं. आता पाऊस ओसरल्यावर जलसंपदा विभागाला अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली जाईल. खरंच नदीच्या बाजूला तो भराव दाबला गेलाय का पाणी वहन करण्याची क्षमता कमी झालीय का याची शहानिशा केली जाईल. हे दुरुस्त करण्याची तयारी ठेवली आहे. १५ हजार क्युसेक पाणी होतं, आता संध्याकाळी सहापर्यंत खडकवासला कमी करायचं आहे. सहा वाजेपर्यंत ५० टक्क्यांपर्यंत आणायचं आहे. जेणेकरून रात्री पाऊस पडला तरीही खडकवासला भरणार नाही - अजित पवार</p>
पूर्वसूचना न देता धरणातील पाणी सोडल्याने अनेक घरात पाणी शिरले. परिणामी घरात चिखल झाला असून सर्व कागदपत्रे भिजली आहेत. सध्या मुलांची प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याने त्यांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र लागतं. हे प्रमाणपत्रही भिजलं आहे. लोकांचं लाखोंचं नुकसान झालं आहे. आधीच पूर्वसूचना दिली असती तर आम्ही नुकसान टाळू शकलो असतो, असं गाऱ्हाणं महिलांनी अजित पवारांसमोर मांडलं आहे.
Heavy Rain Alert Mumbai : मुंबईत बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून पाणी साचल्यामुळे अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
पंचनामे करायला सांगितले आहेत, १०-१५ दुकाने ८०-८५ घरे असतील. पंचनामे केली जातील. त्यांना राज्य सरकार आणि पालिकेकडून सहकार्य केलं जाईल - अजित पवार</p>
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आमदार राजेंद्र शिंगणे यांचे जुने ऋणानुबंध आहेत. त्यांचे वडील सहकार महर्षी दिवंगत भास्करराव शिंगणे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध होते.
पुणे : शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून धरणांमधून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अनेक पूल, साकव वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, धोकायदायक ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.
पुणे : गेले दोन दिवस पुणे आणि धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसाने आज पुणेकरांची झोप उडविली. धरणातील पाणीसाठा वाढल्यानंतर नदीचा विसर्ग करण्याचा निर्णय मध्यरात्री घेण्यात आला आणि त्या नंतर सिंहगड रस्त्यावरील जनजीवन विस्कळीत झाले.
मुंबई १० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. ही पाणी कपात आता २९ जुलैपासून मागे घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. मुंबईतील चारही तलाव आता ओसंडून वाहत आहेत.
पुणे : खडकवासला धरण साखळीत मुसळधार पाऊस झाल्यानंतर मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. पाणी सोडण्यात आल्यानंतर मुठा नदीला पूर आला. मुठा नदीचा पूर पाहण्यासाठी शहरातील विविध पुलांवर नागरिकांनी सहकुटुंब गर्दी केली होती. गर्दीचे नियोजन, तसेच दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध पुलांच्या परिसरात बंदोबस्त ठेवला आहे.
अतिमुसळधार पावसामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, तर काही उड्डाने उशिराने होत आहेत. त्यामुळे एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला असून त्यांनी आपल्या ग्राहाकंना परतावा आणि मोफत रिशेड्युलिंग फ्लाईट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १०० मिलिमीटर, तर घाटमाथ्यावर तब्बल ३०० मि.मी. पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पुन्हा ३५ हजार क्युसेक एवढा करण्यात आला आहे.
Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊयात.