Maharashtra Legislative Assembly Session : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी रविवारी (७ जुलै) रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा कोलमडली आहे. मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा धिम्या गतीने चालू आहे. तसेच रस्ते देखील जाम आहेत. अनेक रस्ते आणि चौकांमध्ये पाणी साचलं आहे. तसेच शहराच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला विधीमंडळाचं अधिवेशनही चालू झालं आहे. त्यामुळे आज दिवसभरात आपण मुंबईसह राज्यातील पावसाचे अपडेट्स आणि अधिवेशनातील घडमोडींवर लक्ष ठेवणार आहोत. इतर महत्त्वाच्या बातम्या देखील या लाईव्ह न्यूज ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Day 1 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या
देशावरील संकट संपले नसून यापुढे कठीण लढाई लढायची आहे, असे प्रतिपादन भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी केले.
अकोला तालुक्यात मोरगाव भाकरे येथील मनोहर महादेव वानखडे (६०) यांच्या घराची भिंत कोसळून मृत्यू झाला.
महाराष्ट्राचे नंदनवन व पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे.
सध्या चर्चेत असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण‘ योजनेसाठी आपले सरकार सेवा केंद्रातून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सोमवारी पहाटे ते सकाळपर्यंत सहा तासात १२१ मीलीमीटर पावसात कळंबोली वसाहत पाण्याखाली गेली कशी याबाबत महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पालिकेच्या विविध विभागातील अधिका-यांशी मुख्यालयात बैठक घेऊन चर्चा केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आमच्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं तर आम्ही त्यांचे आभार मानू. मात्र ते आम्हाला आरक्षण देणार म्हणतात आणि काड्या करत बसतात. त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यावं, काड्या करू नये. मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे आम्हाला कुणबी जातप्रमाणपत्रासह ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यावं, मग आम्ही तुम्हाला (देवेंद्र फडणवीस) डोक्यावर घेऊन नाचू.
नागपूर: राज्य शासनाच्या चुकीच्या भूमिकेमुळे एसटीच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन रखडण्याची शक्यता असून वेतन उशिरा झाल्यास त्याला केवळ राज्य सरकारची बनवा- बनवी कारणीभूत राहील, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
नागपूर : पर्यावरणाशी नाते जोडायचे असेल तर अनेक मार्ग सापडतात. प्रत्यक्षात काम करता येत नसेल तरी संदेशाच्या माध्यमातूनही पर्यावरण संवर्धनाचे काम करता येते. सध्या अधीच एक पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देणारी लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. पर्यावरणाचे निसर्गाशी नाते जोडण्याचा प्रयत्न आम्ही डिजिटल लग्नपत्रिकेच्या माध्यमातून केला आहे. सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासून लग्न पत्रिकेच्या माध्यमातून पर्यावरण, निसर्ग आणि वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासोबत जनजागृती करण्याचा प्रयत्न अमरावती जिल्ह्यातील चौधरी कुटुंबीय करत आहेत.
“जेव्हा भरती आणि मुसळधार पाऊस दोन्ही एकत्र येतात. तेव्हा पाण्याची परिस्थिती अधिक कठीण होते. तसेच पोलीस विभागासह संपूर्ण स्थानिक आणि राज्य प्रशासन मदतीसाठी प्रयत्नशील आहे. कृपया आवश्यक असेल तरच बाहेर पडा. मुंबईकरांनो सुरक्षित राहा, काळजी घ्या!”, असं देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नागपूर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. बोरकर आणि नागपूर विभागाचे तंत्रशिक्षण सहसंचालक एम.बी. डायगव्हाणे यांचे बंधू डॉ. पी. बी. डायगव्हाणे हे महाविद्यालयातील प्राध्यापकांचा मानसिक छळ करत असल्याची तक्रार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
मुंबई : कोल्हापुरहून रविवारी रात्री निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस सोमवारी पहाटे मुंबईच्या पावसात अडकली. नियोजित वेळेपेक्षा तब्बल पाच तासांनी ही गाडी मजल दरमजल करत सीएसएमटी स्थानकात पोहोचली. अंबरनाथ येथे अडकलेल्या या गाडीने २०१९ मधील पुराच्या आठवणी जाग्या केल्या.
कल्याण - कल्याण तालुक्यातील टिटवाळ्या जवळील कल्याण-मुरबाड रस्त्यावरील गोवेली येथील गुरचरण जमिनींवर उभारण्यात आलेली बेकायदा हाॅटेल्स, व्यापारी गाळे अशी एकूण २१ हून अधिक बेकायदा बांधकामे महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी जेसीबीच्या आणि तोडकाम पथकाच्या साहाय्याने भुईसपाट केली.
मुंबईत मध्यरात्री सुरु झालेल्या मुसळधार पावसाने पहाटे ६:३० नंतर विश्रांती घेतली होती. तर, काही भागात हलक्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, आता पुन्हा दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीअंतर्गत विधानसभेचा सर्वात प्रबळ संघर्ष असलेल्या कागल मतदारसंघात राजकीय वाद थेट माजघरापर्यंत पोहोचला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांच्या २० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा विषय अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने लावून धरत घाटगे यांची राजकीय कोंडी करतानाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवर टीकास्त्र डागले आहे. दुसरीकडे घाटगे यांनी पुढील शाहू जयंतीवेळी आमदारकीचा गुलाल लावून येणार, असे आव्हान थेट पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले असल्याने राजकीय खडाखडीला सुरुवात झाली आहे.
डोंबिवलीत मुलाकडूनच आई-वडिलांच्या घरातील तिजोरीतील रोख रकमेची चोरी
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी मराठीतून कामकाज करावे म्हणून शासनाकडून वेळोवेळी आदेश काढण्यात आले आहेत.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आज (८ जुलै) टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली आहे. मुंबईमध्ये ही परीक्षा होत आहे. मात्र मुंबईत होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका या परीक्षेला बसला आहे. त्यामुळे एमपीएससीने तातडीने उपाययोजना केली आहे.
नवी मुंबई : तुर्भे सेक्टर २० येथील सामंत विद्यालयात चोरी झाली असून प्रार्थमिक विभागातील कार्यालयात घुसून चोरट्याने ९० हजार ३०० रुपयांची रोकड चोरी केली आहे. सदर घटनेबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, साचलेल्या पाण्याचा निचरा होत आहे. तसेच सखल भागात पालिका आणि रेल्वेने पाणी उपसण्यासाठी पंप बसवले होते. त्या पंपांनी त्यांचं काम केल्यामुळे आता पाण्याचा निचरा होऊन रेल्वे सेवा सुरळीत होत आहे. हार्बर रेल्वे सेवा सुरू झाली आहे. तर मध्य रेल्वे सुरळीत झाली आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई शहर जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित होते.
सांंगली : सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात तब्बल दोन डझन इच्छुकांनी आतापासूनच मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. स्वपक्षियासह महायुतीतील मित्रपक्षांकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याने विधानसभा निवडणुकीत मंत्री खाडे यांना आव्हान कोणाचे याचे उत्तर मतदारच शोधतील असे दिसते.
सकाळी सात वाजेपर्यंत पडणाऱ्या पावसाने संपूर्ण मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले.
नागपूर : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. दरम्यान रविवारी रात्री मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मुंबई तुंबली आहे. त्याचा परिणाम विधिमंडळाच्या कामकाजावर देखील झाला. आमदार विधानभवनात वेळेत पोहोचू न शकल्याने कामकाज स्थगित करण्यात आले.
मुंबईत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं आजचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.
मुसळधार पावसाने रेल्वे रुळावर पाणी साचल्याने, लोकल सेवा ठप्प झाली. त्यामुळे अनेक स्थानकांवर प्रवासी अडकले आहेत. रेल्वेगाड्या एकाच ठिकाणी थांबल्याने लोकल वाहतूक कोलमडली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या जादा बस चालवण्यात येत आहेत.
वर्धा : नवे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्याची बाब स्वागतार्ह म्हटल्या जाते. त्यातही ज्या भागात ते स्थापन होणार असते, तिथल्या जनतेसाठी आनंदाची पर्वणीच ठरते. आता देशात नवी ११३ वैद्यकीय महाविद्यालये यावर्षी स्थापन करण्याचा निर्णय केंद्राने घेतलं आहे. राष्ट्रीय वैद्यक आयोग म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशनने तशी घोषणा केली आहे.
सातारा : सातारा शहराची लाईफ लाईन असणारा कास तलाव पावसाचा जोर वाढल्यामुळे ओसंडून वाहू लागला. कास धरणाच्या भिंतीवरून पाणी वाहू लागले आहे. तलावात आता ०.००५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. कास तलाव भरल्यामुळे सातारकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे.
पिंपरी : पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) कार्यरत असलेल्या एका पोलीस अंमलदाराचा पिंपळे सौदागर येथे अपघाती मृत्यू झाला. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. सचिन विष्णू माने (वय ४८, रा. आदित्य अपार्टमेंट, स्पाईन रोड, मोशी) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे.
कल्याण– लोकल वाहतूक अनियमित वेळेत असल्याने कर्जत, शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ परिसरातील नोकरदारांनी सोमवारी सकाळी कामाच्या ठिकाणी दुचाकी, खासगी मोटारीने जाण्याचे ठरविले. त्यामुळे नेहमीच्या वाहतुकीत अचानक ही खासगी वाहने अधिक संख्येने धावू लागली. त्यामुळे दुर्गाडीपूल, नेवाळी नाका, शिळफाटा रस्ता, पत्रीपूल भागात सोमवारी सकाळीच वाहतूक कोंडी झाली.
सविस्तर वाचा....
मुंबईत सखल भागांमध्ये पाणी साचलं
मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचलं आहे.
हवामान खात्याने मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, ही विनंती. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.