मुंबई : मुसळधार पावसामुळे राज्याची राजधानी मुंबईची तुंबई झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. अनेक रस्ते बंद आहेत तर कित्येक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली झाली आहे. मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यासह मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा देखील कोलमडली आहे. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक कासवगतीने चालू आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कार्यालय गाठण्यासाठी मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. दुसऱ्या बाजूला विधीमंडळाचं अधिवेशन चालू असल्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांमधून मुंबईकडे येणारे आमदार आणि मंत्री देखील या पावसात अडकले आहेत. त्यामुळे त्यांनाही विधीमंडळ गाठणं अवघड झालं आहे.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह अनेक आमदार रेल्वेने मुंबईला येत होते. मात्र ते ज्या एक्सप्रेसने मुंबईला येत होते, ती एक्सप्रेस कुर्ला आणि दादरच्या मध्ये अडकल्याने इतर प्रवाशांप्रमाणे मंत्री व आमदार रेल्वेतून खाली उतरले आणि रेल्वे रूळावरून चालत मुंबईच्या दिशेने निघाले. हे चित्र पाहून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.
मुंबईची ही स्थिती पाहून विजय वडेट्टीवार म्हणाले, “दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे किती आणि कसे पैसे येतील? याचा विचार करून वेगवेगळ्या फायलींवर सह्या केल्या जातात. हा एकमेव धंदा डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील प्रशासन आणि राज्यातलं शिंदे-फडणवीस सरकार काम करत आहे. त्यामुळे मुंबईची अशी अवस्था होण्याला राज्यातील सत्ताधारी आणि मुंबईचं प्रशासन जबाबदार आहे. या लोकांमुळेच मुंबईची दुरवस्था झाली आहे.”
हे ही वाचा >> रायगडाला पावसाचा तडाखा… अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती; अलिबाग मुरूड मध्ये शाळांना सुट्टी
हे औट घटकेचं सरकार आहे : विजय वडेट्टीवार
विरोधी पक्षनेते म्हणाले, “महाराष्ट्रात आता औट घटकेचं सरकार राहिलं आहे. त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या पावसात कोण कुठे अडकलंय, कोण कुठे अडकून पडेल हे सांगता येत नाही. कारण यांना मुंबईसारख्या शहराचं व्यवस्थापन जमत नाही. म्हणूनच आज राज्याचे मंत्री आणि आमदार पावसात अडकले आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्रीच जर अशा परिस्थितीत अडकत असतील तर सामान्य मुंबईकरांचं काय होणार? जनतेचं काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मला असं वाटतं की हे लोक राज्याचा कारभार सांभाळू शकत नाहीत. या सरकारमध्ये काही करण्याची क्षमताच नाही. ते काही करतील असं वाटतही नाही. हे एक अपयशी सरकार असून त्यांची जनतेत हीच ओळख तयार झाली आहे.”