जालन्यातल्या मराठा आंदोलनावर जो लाठीचार्ज झाला त्या घटनेचे तीव्र पडसाद अजूनही राज्यात उमटत आहेत. मराठा समाजाने आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु ठेवलं आहे. मात्र जो लाठीचार्ज करण्यात आला त्याचा निषेध नोंदवला जातो आहे. सोमवारी राज ठाकरे जालना या ठिकाणी गेले होते तिथे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तर सरकारने एक बैठक घेऊन या सगळ्या प्रकाराविषयी दिलगिरीही व्यक्त केली. मात्र उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी सरकारवर सोमवारीही टीका केली आणि त्याचप्रमाणे आता सामनातूनही टीका करण्यात आली आहे. हे सरकार दुतोंडी असल्याचं सामनात म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोटं बोलण्यात वस्ताद आहेत. आधी तुमची पोपटपंची बंद करा व जालन्यातील मराठा आंदोलकांवर गोळ्या चालवण्याचे, अमानुष लाठीमार करण्याचे आदेश कुणी दिले ते सांगा. तर तुम्ही खरे मराठा! एका तोंडाने आंदोलकांवर लाठ्या, गोळ्या चालवायचे आदेश द्यायचे व दुसऱ्या तोंडाने तुमच्या वेदनांची जाण आहे, असे सांगायचे हे ढोंग आहे. जालन्याच्या आंतरावली गावातील मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीस-पवार या दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला आहे.
हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीसांचं ज्ञान इतकं तोकडं…”, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंचा टोला
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असतानाच जालन्यात पेटलेल्या मराठा आंदोलनाचा भडका जास्तच वाढला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले व शांततेत सुरु असलेल्या आंदोलनावर शिंदे-फडणवीस-पवारांच्या सरकारने अमानुष लाठीमार केला, बंदुका चालवल्या. आता जालनच्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा बळी घेतला आहे. मात्र मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय मराठा आंदोलकांवर निर्घृण हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का?
नागपूरच्या चाणक्यांचे जामनेरी चाणक्य गिरीश महाजन हे मनोज जरांगेंना भेटलाय गेले. मराठा आरक्षणासाठी सरकार काय काय करते आहे ते त्यांनी सांगितले, पण जरांगे पाटील यांनी खिशातून बंदुकीची गोळी काढून महाजनांच्या हाती दिली व सांगितले, तुमच्या सरकारने मराठा आरक्षणासाठी हे केले. आम्ही आरक्षण मागितले, सरकारने बंदुकीची गोळी दिली. तसेच मराठा आरक्षणाचा सरकारी आदेश म्हणजेच जीआर हातात पडत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा दमच जरांगे पाटील यांनी भरला. जालन्यातल्या आंतरवाली गावात एक सामान्य कार्यकर्ता जिद्दीने त्याच्या समाजासाठी उपोषणाला बसला आहे. त्याने प्राण पणास लावले आहे व खोकेवाल्या सरकारपुढे तो झुकायला तयार नाही. दिल्ली विधानसभेवर ताबा मिळवण्यासाठी मोदी सरकारने एका रात्रीत अध्यादेश आणला. संसदेत घटना दुरुस्ती करुन दिल्लीतली लोकशाही मोडून केजरीवाल सरकारचे सर्व अधिकार हातात घेतले. मग मराठा आरक्षणाची मर्यादा वाढवून प्रश्न सोडवायला हवा.
हे पण वाचा- “जालन्यात जी लाठीचार्जची घटना घडली त्याबद्दल मी क्षमा..”, देवेंद्र फडणवीस यांची बैठकीनंतर पहिली प्रतिक्रिया
फडणवीस मुख्यमंत्री असताना भीमा कोरेगावची दंगल पेटली व फडणवीस हात चोळत बसले. आता ते गृहमंत्री आहेत व मराठा आंदोलनक हिंसक झाले आहेत. मराठा समाजाने आता दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही इशाराच दिला आहे की फडणवीस यांच्या सरकारमधून बाहेर पडा अन्यथा परिणामांना सामोरे जा. हा इशारा गंभीर आहे. संपूर्ण राज्य या प्रश्नी पेटवून भाकऱ्या शेकण्यासाठी मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला घडवून आणला काय? असा प्रश्नही सामनातून विचारण्यात आला आहे.