सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळावरील मुंबई – सिंधुदुर्ग सेवा बंद झाल्याने प्रवाशी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान ही सेवा येत्या पंधरा दिवसांत सुरू झाली नाही तर विमानतळाला कुलूप लावण्यात येईल असा इशारा ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
चिपी मुंबई विमानसेवा देणाऱ्या कंपनीचा करार संपुष्टात आल्यानंतर ही सेवा बंद झाली. याला जवळपास दोन महिने होत आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे विमानसेवा महत्त्वाची मानली जाते. दरम्यान हवामान खराब असेल तर गोवा राज्यातील मोपा विमानतळावर विमान उतरले असल्याची उदाहरणे आहेत. याशिवाय रात्रीच्या वेळी विमान उतरले पाहिजे अशी सुविधा चिपी विमानतळावर नाही तोही फटका प्रवाशांना बसला आहे.
मुंबई ते चिपी विमानसेवा बंद ठेवण्यात आली असतानाच हैदराबाद आणि बंगलोर सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. सध्या पुणे ते चिपी अशी फक्त शनिवार आणि रविवारी विमानसेवा सुरू आहे. दरम्यान ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी चिपी विमानतळावर येत्या पंधरा दिवसात मुंबई उड्डाण सुरू झाले नाही तर विमानतळाला थेट कुलूप लावू, असा इशारा दिला आहे.पंधरा दिवसात विमानसेवा सुरू होईल. असे वारंवार सांगणाऱ्या भाजप नेत्यांना आपल्या घोषणांचा विसर पडला की काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत नाईक म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून पाच वर्षांपूर्वी चिपी विमानतळ सुरू झाले. सुरुवातीच्या काळात मुंबई आणि त्यानंतर बेंगलोर, पुणे, हैदराबाद या मार्गावर चिपी येथून विमानसेवा सुरू झाली होती. पण दोन महिन्यांपूर्वी मुंबई येथील विमान सेवा बंद झाली. आता केवळ एक विमान ये जा करत आहे. येथील विमानसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे हे विमानतळ बंद करण्याचा घाट शासनाकडून घातला जात आहे का? अशी शंका येत आहे.
मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल, असे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांनी सांगितले होते, पण ही सेवा अजूनही सुरू झालेली नाही आता हे विमानतळ बंद होण्याच्या स्थितीत आहे, असे त्यांनी बोलताना सांगितले.