Financial Fraud Cases in Pune: मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. पण याच मुंबईत सर्वाधिक आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत असल्याची बाब समोर आली आहे. मुंबईपाठोपाठ आर्थिक फसवणूक होण्यात पुणेकरांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात नोंद झालेल्या आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणांबाबतची माहिती समोर आली आहे. त्यात महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये किती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे आणि त्यात फसवणूक झालेली आकडेवारी याची आकडेवारी देण्यात आली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
आर्थिक फसवणूक होण्यात मुंबईकर सर्वात वर!
गेल्या वर्षी महाराष्ट्रात एकूण २ लाख १९ हजार ०४७ आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांत फसवणूक झालेली एकूण रक्कम तब्बल ३८ हजार ८७२ कोटी १४ लाख इतकी आहे! या प्रकरणांमध्ये सर्वाधिक प्रकरणं ही मुंबईत नोंद झाली आहेत. त्यामुळे एकट्या मुंबईत ५१ हजार ८७३ आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या फसवणुकीची रक्कम थेट १२ हजार ४०४ कोटी १२ लाख इतकी प्रचंड आहे.
पुणेकरांचा दुसरा क्रमांक…
दरम्यान, एकीकडे आर्थिक राजधानी पहिल्या क्रमांकावर असताना दुसरीकडे पुण्यात दुसऱ्या क्रमांकाचे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांची एकूण संख्या ही २२ हजार ०५९ इतकी आहे. या फसवणुकीची रक्कम ५ हजार १२२ कोटी ६६ लाख इतकी आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्याचा विचार करता दाखल प्रकरणांची संख्या ४३ हजार ८०२ इतकी असून त्यातील १२ हजार ११५ प्रकरणं पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाली आहेत. इथे फसवणुकीची रक्कम ३ हजार २९१ कोटी २५ ला इतकी आहे. तर पुणे ग्रामीण भागात आर्थिक फसवणुकीमुळे झालेल्या नुकसानाचा आकडा ४३४ कोटी ३५ लाख इतका आहे.
ठाण्यात आर्थिक गुन्ह्याची किती प्रकरणं?
दरम्यान, मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यात आर्थिक गुन्ह्याची तब्बल ३५ हजार ३८८ प्रकरणं गेल्या वर्षभरात नोंद झाली आहेत. यापैकी ठाणे शहरात २० हजार ८९२, नवी मुंबईत १२ हजार २६० तर ठाणे ग्रामीणमध्ये १२३६ प्रकरणांची नोंद झाली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आर्थिक फसवणूक गुन्ह्यांमध्ये नुकसान झालेल्या रकमेचा आकडा ८ हजार ५८३ कोटी ६१ लाख आहे. मीरा भाइंदर आणि वसई-विरारमध्ये एकूण ११ हजार ७५४ आर्थिक फसवणुकीचे प्रकार नोंद झाले असून त्यातून १४३१ कोटी १८ लाखांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.
विदर्भात काय स्थिती?
नागपूर शहरात आर्थिक फसवणुकीचे ११ हजार ८७५ गुन्हे नोंद झाले आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये हीच संख्या १६२० इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीतून नुकसान झालेली रक्कम १४९१ कोटी ७ लाख इतकी आहे. अशा गुन्ह्यांची नाशिकमधील संख्या ९१६९ इतकी असून त्यातील ६३८१ गुन्हे नाशिक शहरात तर २७८८ गुन्हे नाशिक ग्रामीणमध्ये दाखल झाले आहेत. यातील रक्कम १०४७ कोटी ३२ लाख आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये ६०९० गुन्ह्यांमध्ये ५४३ कोटी ६१ लाखांची फसवणूक तर अमरावती जिल्ह्यात २७७८ गुन्ह्यांमध्ये २२३ कोटी ५९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात ४८३७ गुन्हे तर अमरावती शहरात १८१९ गुन्हे दाखल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात ३४५७ गुन्ह्यांमध्ये ३९४ कोटी ५४ लाखांची फसवणूक झाली आहे.
याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये बुलढाणा (१५३१ गुन्हे), चंद्रपूर (१७९२) आणि लातूर (१६२४) या जिल्यांमध्ये अनुक्रमे २३९ कोटी १९ लाख, १७५ कोटी ३९ लाख आणि २४० कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.