आज (१२ मार्च) पासून सुरू होत असलेल्या विज्ञान (आयटी) प्रथम वर्षांच्या परीक्षेचे हॉल तिकीट हातात असलेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन प्रवेश मुंबई विद्यापीठाकडून निश्चित न झाल्याने त्यांचा प्रवेश रद्द करण्यात आला असल्याचे महाविद्यालयाने कळविल्याने विद्यार्थी व पालकवर्गात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या या गोंधळी कारभारामुळे आपल्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता असून, त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यापीठाबरोबरच येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर राहील, असा इशारा संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
याबाबतच्या अधिक माहितीनुसार, अखिल अनिरुद्ध दळी व जयप्रकाश विनोद गांधी यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांत विज्ञान आयटी या वर्गात येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. या विद्यार्थ्यांना प्रवेश देताना महाविद्यालयाने त्या वेळी कोणतीही अट अगर नियम याबाबतची कल्पना दिलेली नव्हती, असे अनिरुद्ध दळी या पालकांनी सांगितले. महाविद्यालय सुरू झाले आणि परीक्षेचे वेळापत्रकही विद्यापीठाने जाहीर केले. त्यानुसार उद्या (मंगळवार) पासून विज्ञान-आयटी, प्रथम वर्षांच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना धक्का देणारे पत्र गो. जो. महाविद्यालयाकडून मिळाले.
दिनांक ९ मार्च २०१३ रोजीच्या या पत्रात असे म्हटले आहे की, सदर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मध्ये प्रथम वर्ष विज्ञान (आयटी) या वर्गात प्रवेश घेतला होता; परंतु त्यांना इयत्ता १२ वीमध्ये ४५ टक्क्य़ांपेक्षा कमी गुण असल्याने त्यांचा प्रवेश मुंबई विद्यापीठाकडून निश्चित होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांचा महाविद्यालयातील प्रवेश रद्द करण्यात आला आहे, असे पत्र अखिल दळी व जयप्रकाश गांधी या विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविण्यात आले आहे. ऐन परीक्षा सुरू होण्याच्या तोंडावर महाविद्यालयाकडून आलेल्या या पत्रामुळे पालकांत संताप व्यक्त होत असून, आपल्या पाल्याच्या मानसिकतेवरही त्याचा परिणाम होण्याची भीती आहे, असे दळी व गांधी यांनी सांगून याला विद्यापीठाबरोबरच महाविद्यालयाचे व्यवस्थापनही जबाबदार आहे. मात्र या विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट असल्यामुळे त्यांना परीक्षेला बसू देण्यास कुणीही मज्जाव करणार नाही, असे पत्रकारांनी या पालकांना सांगितले.

Story img Loader