आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई विद्यापीठाच्या झाराप येथील उपकेंद्रासाठी दहा हेक्टर जागा शासनाने लीजवर मुंबई विद्यापीठाकडे वर्ग केली आहे. या जागेसंदर्भातील कागदपत्रे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समारंभात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, विद्यापीठाचे रजिस्ट्रार मकसूद खान, संजीव कर्पे, मोहन होडावडेकर, योगेश प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार विनायक राऊत या प्रसंगी बोलताना म्हणाले की, अगदी अल्पावधीत झाराप येथील विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली. या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी मोलाचे सहकार्य केले. याबद्दल त्यांचे विशेष आभार मानणे हे मी माझे कर्तव्य समजतो. कुलगुरू देशमुख यांनी आता झाराप उपकेंद्राचा सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, तसेच कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर द्यावा.

विद्यार्थ्यांच्या सहभागाने गावांचा विकास

कुलगुरू संजय देशमुख या वेळी म्हणाले की, कोकणाशी माझे बऱ्याच वर्षांपासूनच नाते आहे. रत्नागिरी उपकेंद्रातही मी बरीच वर्षे कार्यरत होतो. पश्चिम घाटातील जैवविविधता अभ्यासण्यासाठी झाराप येथील उपकेंद्रात सुविधा निर्माण करण्याचा मानस आहे. या ठिकाणी बोटॅनिकल गार्डनही प्रस्तावित करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या स्टडी टूरसाठी निश्चित उपयोग होईल. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित पंतप्रधान महोदयांचा कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यावर भर दिला जाणार असून फूड क्राफ्ट इन्स्टिटय़ूट, तसेच हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट महाविद्यालयही या झाराप उपकेंद्रावर सुरू करण्यात येईल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सहभागाने गावाचा विकास ही संकल्पनाही राबविण्याचा आमचा मानस असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

सागरी संशोधनाची नितांत गरज

पालकमंत्री दीपक केसरकर या प्रसंगी बोलताना म्हणाले की, मुंबई विद्यापीठाचे झाराप येथे उपकेंद्र सुरू होत आहे. ही जिल्ह्य़ाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आनंदाची बाब आहे. जैवविविधतेची जपणूक होण्यासाठी तसेच सागरी संशोधनासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समुद्रकिनारी जागा पाहावी व तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. सर्वसामान्यांच्यात समरस होणारे कुलगुरू असा संजय देशमुख यांचा गौरव करून ते म्हणाले की, शासनाबरोबरच जिल्हा प्रशासनानेही तत्परतेने कागदपत्रांची पूर्तता करून झाराप उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचेही त्यांनी या वेळी आभार मानले.

शेवटी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आभार मानले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तसेच पत्रकार उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university substation in sawantwadi