उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता नगर एसआरए प्रकल्पात काही सदनिका हस्तगत केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या आरोपाप्रकणी पेडणेकर यांची चौकशी केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, याच कथित घोटाळ्यासंदर्भात पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असताना आता किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी कथित घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे माध्यम प्रतिनिधींसमोर मांडली आहेत. तसेच पेडणेकर काल (२९ ऑक्टोबर) हातात कुलूप घेऊन सदनिका बंद करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना पुढील वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळू शकतो, असा खोचक टोला लगावला आहे.
हेही वाचा >>> एसआरए घोटाळा: किशोरी पेडणेकर अडचणीत? दादर पोलिसांकडून पुन्हा समन्स, चौकशीसाठी हजर होण्याचा आदेश
“पेडणेकर यांना कशाचीही भीती नसेल तर त्या पोलीस चौकशीला का घाबरत आहेत. या प्रकरणाबाबत मी एका वर्षापूर्वी ठाकरे सरकारच्या वेगवेगळ्या विभागाकडे तक्रार केली होती. वांद्रे पूर्व निर्मल नगर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती. एसआरएकडे पुरावे दिले होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून दबाव आल्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. आता मी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केलेली आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
हेही वाचा >>> पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमला जडले होते ड्रग्जचे व्यसन! म्हणाला “कोकेनच्या सवयीमुळे…”
“किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात सहा ठिकाणी चौकशी सुरू झालेली आहे. मी उच्च न्यायालयात केलेल्या जनहीत याचिकेवरदेखील सुनावणी सुरू आहे. तर एसआरएनेदेखील या प्रकरणी चौकशीला सुरुवात केली आहे. करोना काळात कमाई घोटाळा, बेनामी संपत्ती असे वेगवेगळे आरोप पेडणेकर यांच्यावर आहेत. याच कारणामुळे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने या सर्व प्रकरणांची चौकशी करावी,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.
हेही वाचा >>> Bharat Jodo Yatra: “राहुल गांधी यांनी माझा हात धरला, कारण…” अभिनेत्री पुनम कौरचं भाजपाला सडेतोड उत्तर
“किशोरी पेडणेकर तसेच त्यांचे पुत्र साईनाथ पेडणेकर यांनी कागदपत्रांत खाडाखोड केलेली आहे. गोमाता जनता एसआरए नगर येथे जाऊन पेडणेकर यांनी नाटक केले. त्या चावी आणि कुलूप घेऊन गेल्या. या भागात माझे गाळे असतील तर त्यांना टाळं लावा, असे त्या म्हणत होत्या. पुढील वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार पेडणेकर यांना मिळू शकतो,” असा खोचक टोलाही सोमय्या यांनी लगावला. तसेच गोमाता जनता नगरात संजय अंधारी नावाच्या व्यक्तीला एसआरए अंतर्गत एक फ्लॅट मिळाला होता. किशोरी पेडणेकर आणि साईनाथ पेडणेकर यांच्या कंपनीने या फ्लॅटसंबंधात करार केलेले कागदपत्रं भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयाकडे दिलेले होते. या कागदपत्रांवर संजय अंधारी यांच्या सहीमध्ये बदल झालेला आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.