पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाठार (ता. कराड) येथे झालेल्या अपघातात कुर्ला येथील शिवसेनेचे उपविभागप्रमुख मंगेश कुडाळकर यांचे वडील अनंत कुडाळकर (वय ६५) यांचे जागीच निधन झाले तर मंगेश कुडाळकर (४१) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाचजण या अपघातात जखमी झाले आहेत.कुडाळकर कुटुंबीय कोल्हापूरला निघाले होते. वाठार येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर त्यांची तवेरा गाडी आदळून सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. अपघातामध्ये अनंत कुडाळकर (वय ६५) यांचे जागीच निधन झाले. कल्पना अनंत कुडाळकर (वय ६३) आणि नेहा मंगेश कुडाळकर (वय ३८) यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जय मंगेश कुडाळकर (वय १२) हाही जखमी आहे. मंगेश कुडाळकर यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.
या अपघातामध्ये यश मंगेश कुडाळकर (वय १४) बचावला असून ट्रकचा चालक सिकंदर जमखंडीकर हाही जखमी झाला आहे. ट्रक पुण्याच्या दिशेकडे तोंड करून थांबला होता तर मोटार कोल्हापूरच्या दिशेने निघाली असताना हा अपघात झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा