ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसागणिक वाढू लागला असून, आव्हाड यांना धक्का देण्यासाठी त्यांच्या मुंब्य्रातील गडालाच सुरुंग लावण्याची जोरदार तयारी सुरू झाल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात आहे. ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील किमान आठ ते दहा माजी नगरसेवकांना गळाला लावत मुंब्रा येथील आव्हाड विरोधकांची मोट बांधण्याची रणनिती सध्या आखली जात असून, ‘मुंब्रा विकास आघाडी’ नावाने आव्हाडांना आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून या विरोधी गटाला रसद पुरविली जात असल्याची उघड चर्चा ठाण्यात असून, आव्हाड यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमीत्त मुंब्य्रात मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या बॅनरबाजीमुळे या घडामोडींना आणखी वेग आल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – “लखीमपूर खिरी हिंसाचाराची घटना गंभीर आणि निर्घृण!” आशिष मिश्राच्या जामिनाला उत्तर प्रदेश सरकारचा विरोध

ठाणे महापालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबदबा असला, तरी कळवा-मुंब्रा या विधानसभा क्षेत्रात जितेंद्र आव्हाड यांची मोठी पकड आहे. या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून येत आव्हाड यांनी मुस्लीम बहुल मुंब्य्रापाठोपाठ कळवा परिसरातूनही मोठे मताधिक्य मिळविल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. साडेपाच वर्षांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत कळवा-मुंब्रा मतदारसंघात एकूण प्रभागांची संख्या ४२ इतकी होती. यापैकी मुंब्य्रातील २३ पैकी १८ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते.

कळव्यातील आठ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला होता. मात्र, येथील आठ जागांवर शिवसेनेचे नगरसेवक निवडून आल्याने आव्हाडांना कळव्यातून अपेक्षित यश मिळाले नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि आव्हाड यांच्यातील समन्वयाच्या राजकारणाची चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात नेहमीच दबक्या आवाजात चर्चिली जात असे. मात्र, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय क्षितीजावरील उदयानंतर मात्र आव्हाड आणि शिंदे यांच्यातील मैत्रीपूर्ण राजकारणाला तडा जाऊ लागला.

गेल्या काही वर्षांत तर आव्हाड आणि खासदार शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षाने टोक गाठल्याचे पहायला मिळाले आहे. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद येताच आव्हाड यांच्यावर नजिकच्या काळात दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांमुळे संघर्ष आणखी वाढला. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात थेट मुख्यमंत्र्यांविरोधात भूखंड घोटाळ्याची रसद पुरवून आव्हाडांनीही ठाण्यातील हा संघर्ष थेट राज्य स्तरावर नेल्याची चर्चाही रंगली. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आव्हाडांना त्यांच्या मतदारसंघातच धक्का देण्याची रणनिती शिंदे गटाकडून आखली जात असून, यामुळे ठाण्यातील राजकीय घडामोडींना गेल्या काही महिन्यांपासून वेग आल्याचे पहायला मिळत आहे.

हेही वाचा – विशाळगडावरील अतिक्रमणावरून राजकीय नेत्यांमध्येच जुंपली

मुंब्र्यातील विरोधकांना रसद

ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंब्रा भागातील १८ नगरसेवक असले, तरी त्यामध्ये काही आव्हाड विरोधकांचाही समावेश आहे. मुंब्य्रातील राजन किणे हे आव्हाडांचे कडवे राजकीय विरोधक मानले जातात. मात्र, साडेपाच वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी आव्हाडांशी वैर संपवून राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद येताच किणे कमालिचे सक्रिय झाले असून, आव्हाडांवर नाराज असलेले काही माजी नगरसेवक, तसेच मुंब्य्रातील मुस्लीम समाजातील काही बड्या नेत्यांची मोट बांधण्यास किणे यांनी सुरुवात केली आहे.

खासदार शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या संपर्कात ही मंडळी असल्याची चर्चाही जोरात असून आव्हाडांच्या गटातील आठ ते दहा नगरसेवक वेगळे काढून माजी महापौर नईम खान, रौफ लाला यांच्या मदतीने मुंब्रा विकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सध्या वेगात असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीत या आघाडीच्या झेंड्याखाली आव्हाडांना आव्हान उभे करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

चौकट घ्यावी

आव्हाड यांच्या पहिल्या विधानसभा विजयात त्यांचे राबोडी भागातील कट्टर समर्थक नजीब मुल्ला यांनी निर्णायक भूमीका बजाविली होती. गेल्या काही वर्षापासून आव्हाड आणि मुल्ला यांच्यात फारसे सख्य राहीलेले नाही. मुल्ला यांचा मुंब्रा भागात चांगला संपर्क आहे. मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा भागात मोठी बॅनरबाजी सुरू असून, त्यांच्या समर्थकांनी यानिमीत्ताने मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. मुल्ला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटचे संबंध असून, वाढदिवसानिमित्त मुल्ला समर्थक कमालीचे सक्रिय झाल्याने त्याचेही वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

हेही वाचा – म्हैसाळ सौरउर्जा प्रकल्पातून सांगलीत खासदारांची मतपेरणी

माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी समर्थकांकडून शुभेच्छा देणारे बॅनर लावले जातात. हे काही नव्याने घडते आहे आणि यामागे राजकारण आहे, असा याचा अर्थ काढण्याची अजिबाज आवश्यकता नाही, असे राष्ट्रावादी काँग्रेसचे माजी गटनेते नजीब मुल्ला म्हणाले.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कोणीही उमेदवार असला तरी आम्ही त्याचे स्वागत करू. शिंदे गट, भाजप अथवा नव्याने कानावर येत असलेल्या मुंब्रा विकास आघाडीने येथे उमेदवार द्यावाच. २०१९ पेक्षा अधिक मताधिक्याने आव्हाड यांचा विजय होईल हे मी खात्रीने सांगतो, असे ठाणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष आनंद परांजपे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbra vikas aghadi against jitendra awhad shinde group strategy to win mumbra print politics news ssb