भाजपचे ‘मिशन – २०१४’
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असलेले भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आगामी निवडणुकांचे नेतृत्व सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या आधारे ‘मिशन-२०१४’ ची रणनीती आखली आहे. सत्ताधाऱ्यांचे घोटाळे, वाढती महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या ज्वलंत विषयांवर सरकारविरोधात रस्त्यावर येऊन कडवा संघर्ष करण्यापूर्वी त्यांनी ‘घरदुरूस्ती’ ला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. पक्षाच्या आमदार-खासदारांशी तसेच संभाव्य उमेदवारांशी ‘वन-टू-वन’ चर्चा करणे, संघटनात्मक बांधणी व रचना पूर्ण करणे, प्रवाहाबाहेर गेलेल्यांना पक्षकार्यात सहभागी करून घेणे, काँग्रेसविरोधी विचारांचे पक्ष, संघटना व संस्था तसेच राज्यातील प्रभावी घराणी आपल्याबरोबर जोडणे अशा काही कार्यक्रमांची रचना त्यांनी केली आहे.
भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत दादर येथे पार पडली. मुंडेंकडे नेतृत्वाची धुरा आल्यानंतर प्रथमच झालेल्या प्रदेश बैठकीत निवडणूक व्यूहरचना ठरवण्यात आली. त्यानुसार, भाजप आमदार व खासदारांशी मुंडे स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. पराभूत झालेले मात्र दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले तसेच संभाव्य उमेदवार होऊ शकतील अशा कार्यकर्त्यांशी ते व्यक्तिगत संवाद साधणार आहेत. त्या-त्या मतदारसंघातील प्रश्न, स्थानिक गणिते, पक्षाची ताकद तसेच दुर्बल स्थाने, तेथील संभाव्य अडीअडचणी आदींची सविस्तर माहिती ते या माध्यमातून घेणार आहेत. येत्या १५ डिसेंबपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मुंडेंचा मानस असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने ‘मिशन-२०१४’ चा फॉम्र्युला ठरवला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. मुंडे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आदींसह राज्यभरातील प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.
नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला ताज्या विषयांवरून घेरण्यात येणार आहे. औरंगाबाद येथे मराठवाडय़ातील प्रश्नांवर आंदोलनाचे, तर सांगलीत दुष्काळी परिषद भरवण्याचे भाजपचे नियोजन आहे. याखेरीज, सत्ताधाऱ्यांचे घोटाळे बाहेर काढणे, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर येऊन संघर्ष करणे, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या विरोधातील पक्ष, संघटना, संस्थांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्वत:चा प्रभाव असणारी अनेक घराणी राज्यात आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीपासून चार हात लांब असलेली घराणी भाजपशी जोडण्याचा प्रयत्न होणार आहे. वेगवेगळ्या कारणावरून पक्षातील जुनी-जाणती प्रवाहाबाहेर गेलेली मंडळी पुन्हा सक्रिय करून त्यांच्या कार्याचा उपयोग करण्यात येणार आहे. निवडणुकीशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबींसाठी दोन अभ्यासगटांची स्थापना करण्यात येणार आहे.
सरकारच्या लोकहिताच्या विरोधात असणारी धोरणे त्याचप्रमाणे सत्ताधाऱ्यांचे गैरव्यवहार यासंदर्भात पक्षाने आंदोलनात्मक भूमिका घ्यावी. मात्र, एखाद्या व्यक्तीला ‘टार्गेट’ न करण्याची भूमिका या वेळी मांडण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा