केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनामुळे देशपातळीवरील इतर मागासवर्गीय चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. तसेच त्यांच्या निधनाने ओबीसी चळवळीचा एक खंदा नेता महाराष्ट्राने गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आपली भावना व्यक्त केली. मुंडे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर त्यावर विश्वासच बसला नाही. मुंडे जनजीवनाशी एकरूप झालेले नेते होते. गेली पंधरा वर्षे दु:ख आणि अडचणी सोसून ते उभे राहिले आणि आता चांगले दिवस आले असताना ही दु:खद घटना घडली. ओबीसी चळवळ पुढे नेण्यासाठी मुंडे यांनी मोठा हातभार लावला. ओबीसींच्या प्रश्नावर कुणाचीही पर्वा न करता त्यांनी समर्थन दिले. ओबीसींची जनगणना व्हावी म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. पक्षाला न विचारता या प्रश्नावर आपली भूमिका जाहीर केली. यातून त्यांची ओबीसींबद्दलची आत्मीयता दिसून येते. आमचे राजकीय मतभेद असले तरी ओबीसींच्या प्रश्नावर एकमत होते. अलीकडेच त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुती घडवून आणण्यासाठी फार मोठे प्रयत्न केले. मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे आणि माझे व्यक्तिगत असे मोठे नुकसान झाले आहे. ओबीसींच्या हिताचा त्यांनी सदैव पुरस्कार केला. त्यांच्या निधनाने ओबीसी चळवळीची मोठी हानी झाली आहे, असे भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. दरम्यान, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद यांनी देशपातळीवर ओबीसी चळवळीला शक्ती देणारे गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व होते, असे सांगितले. मुंडे यांच्या निधनामुळे ओबीसी चळवळीची मोठी हानी झाल्याची भावना डॉ. कमोद यांनी  व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा