नितीन गडकरींचे राष्ट्रीय अध्यक्षपद जाताच सक्रिय झालेल्या मुंडे गटाकडून भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजकीय वजन वापरण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने गडकरींना शह देण्यासाठी सुरू असलेली अंतर्गत मोर्चेबांधणी आता स्पष्ट झाली आहे. विदर्भातील गडकरी विरोधकांचीही याला फूस असल्याने मुंडेंना शह देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. परिणामी प्रदेशाध्यक्षपदासाठी विदर्भातील दोन दिग्गज आमदार सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच तीव्र चुरस निर्माण झाली आहे.
मुंडे गटाने एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी अचानक समोर आणली आहे. गडकरींना राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळण्याची शक्यता दृष्टिपथात असेपर्यंत मुनगंटीवार यांचे पारडे जड वाटत होते. मुनगंटीवारांना पुढे चाल मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, चक्रे फिरल्याने त्यांचेही प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले आहे.
मनुगंटीवारांची प्रदेशाध्यक्षपदाची तीन वर्षांची टर्म संपुष्टात आल्याने पुढील आठवडय़ात होणाऱ्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याचा फैसला होणार आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचा इन्कार केला. फडणवीस म्हणाले, मुनगंटीवार यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून झालेली कामगिरी अत्यंत समाधानकारक आहे, त्यामुळे त्यांना पुढे चाल मिळल्यास आपली कोणतीही हरकत राहणार नाही. मात्र, पक्षाने माझ्यावर नवीन जबाबदारी सोपविल्यास ती स्वीकारण्याचीही माझी तयारी आहे. यात कोणत्याही प्रकारची गटबाजी होत असल्याचे फडणवीस यांनी नाकारले. मुनगंटीवार यांनी या वादात पडण्यास नकार दिला असून पक्ष ठरवेल, त्यानुसार जबाबदारी पार पाडण्याची तयारी दर्शविली आहे. उल्लेखनीय म्हणजे फडणवीस आणि मुनगंटीवार यांच्यातील समन्वय अत्यंत चांगला असून दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्र पातळीवर एकत्र काम केले आहे.
वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांची सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत अलीकडेच चर्चा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्षपदावर मुनगंटीवारांना कायम ठेवण्याला राजनाथ आणि गडकरी या दोघांनीही अनुकूलता दर्शविल्याचे समजते. त्यामुळे त्यांना दुसरी संधी दिली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे मुंडे गटाने राज्याला तरुण नेतृत्त्व देण्याचा आग्रह धरल्याने फडणवीस यांचे नाव अचानक समोर करण्यात आले. गडकरींचे वर्चस्व असलेल्या आणि संघ मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नागपुरात राहून गडकरी विरोधी गटाचा म्हणवून घेणे फडणवीसांना महागात पडू शकते. त्यामुळे धोका पत्करण्याची त्यांची तयारी नाही. आतापर्यंतच्या वाटचालीत मुनगंटीवार यांनी दोन्ही गटांशी जुळवून घेतले आहे. फडणवीसांनीही एक अभ्यासू आमदार म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांच्यावरही कोणत्याच गटाचा शिक्का अद्याप तरी बसलेला नाही. परंतु, प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाव आल्याने त्यांच्या पुढच्या खेळीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Story img Loader