महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसला. येत्या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प बुधवारी प्रशासनाकडून स्थायी समितीस सादर करण्यात येणार होता, मात्र तत्पूर्वीच आचारसंहिता लागू झाल्याने त्यासाठी बोलावलेली स्थायी समितीची सभाच रद्द करण्यात आली.
मनपाची निवडणूक झाल्यानंतर स्थायी समिती स्थापन होण्यात मोठाच वेळ गेला. सुमारे महिना, सव्वा महिना ही प्रक्रिया लांबली. दहा दिवसांपूर्वी समिती सदस्यांची व मंगळवारीच सभापतिपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर डागवाले यांची निवड झाली. त्यानंतर लगेचच घाईतच मनपा प्रशासनाने बुधवारी समितीची सभा बोलावली होती. प्रशासनाने तयार केलेला अर्थसंकल्प या सभेत स्थायी समितीला सादर करण्यात येणार होता. मात्र सभेपूर्वीच दिल्लीत लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिताही लागू झाली. त्यामुळे सकाळी ११ वाजता बोलवण्यात आलेली ही सभाच रद्द करण्यात आली.
आता लोकसभा निवडणुकीनंतरच म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतरच मनपाचा अर्थसंकल्प मांडण्यात येईल. तोपर्यंत नियमानुसार प्रशासनाला अत्यावश्यक खर्च करता येईल. मात्र दरम्यानच्या काळात अर्थसंकल्पासाठी निवडणूक आयोगाकडे विशेष बाब म्हणून परवानगी मागण्याचा मनपाचा विचार आहे. ती मिळाली तर निवडणुकीपूर्वीही अर्थसंकल्प मांडून तो मंजूर करता येईल.