आज अमरावती बंदची हाक
महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीचे आदेश कुठल्याही क्षणी निघू शकतात, असे संकेत आहेत. त्यांची बदली रद्द व्हावी, यासाठी नगरसेवकांनी दबावगट तयार करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी शुक्रवारी येथील राजकमल चौकात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली, तर उद्या, शनिवारी अमरावती बंदची हाक देण्यात आली आहे.
अल्पावधीतच अमरावतीत लोकप्रिय ठरलेल्या चंद्रकांत गुडेवार यांची अवघ्या १३ महिन्यांमध्ये बदली होणे अनेकांना रुचलेले नाही. मात्र, काही हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी गुडेवार यांना माघारी पाठवण्याचा विडा उचलला होता. त्यांच्या बदलीची चर्चा सुरू असतानाच अनेक नगरसेवक उघडपणे त्यांच्या समर्थनार्थ उभे ठाकले. चंद्रकांत गुडेवार यांना तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करू द्यावा, त्यांची मध्येच बदली करू नये, असा ठराव गुरुवारी स्थायी समितीत एकमताने संमत करून लगोलग नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी दिली. बसपानेही आयुक्तांची बदली करू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. त्यांच्या बदलीने विकासकामांना खीळ बसेल, त्यामुळे त्यांची बदली करू नये, अशी मागणी नगरसेवक प्रशांत वानखडे, सुनील काळे, प्रदीप बाजड, धीरज हिवसे, अब्दूल रफिक, नंदकिशोर वऱ्हाडे, अरुण जयस्वाल, प्रवीण मेश्राम, राजू मानकर, डॉ. राजेंद्र तायडे आदींनी केली आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटरसायकल मोर्चा काढून त्यांची बदली करू नये, या मागणीचे निवेदन सादर केले. गुडेवार अमरावतीत आयुक्तपदी राहणे आवश्यक असून, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांची बदली थांबवावी; अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी युवा स्वाभिमानने निवेदनात केली आहे. गुडेवार रुजू झाल्यापासून महापालिकेच्या कामात पारदर्शकता आली आहे. विविध करांच्या स्वरूपात महापालिकेच्या तिजोरीत मोठय़ा प्रमाणावर रक्कम जमा झाल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारली आहे. महापालिकेची मालमत्ता बिल्डरांच्या घशात जाण्यापासून वाचवण्यासाठी गुडेवार यांनी प्रयत्न केले. त्यांची बदली झाली, तर पालकमंत्र्यांना जनता कधीच माफ करणार नाही, असेही निवेदनात नमूद आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा