महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी जनसुराज्य पक्ष एकत्र लढवणार असून, राष्ट्रवादी- जनसुराज्यला स्वबळावर सत्ता मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त करताना निवडणुकीची खरी लढत काँग्रेसबरोबरच होईल, भाजप-सेनेला कोल्हापूरची पुरोगामी जनता स्वीकारणार नाही, असेही मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
महापालिकेच्या निवडणुकीबद्दल आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, की राष्ट्रवादी जनसुराज्य एकत्रित निवडणूक लढवणार आहे. दोन दिवसांत जागावाटपाबाबत निर्णय होईल. निवडून येण्याची क्षमता, स्वच्छ चारित्र्य व सर्वसामान्य जनतेशी असलेला संपर्क या निकषावर उमेदवारी दिली जाईल. विद्यमान नगरसेवकांना बदललेल्या प्रभागातील आरक्षण तेथील संपर्क याचा विचार करून उमेदवारी दिली जाईल, पण गेल्या १० वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शासनाकडून १००० कोटींचा निधी आणून शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. आम्हाला स्वबळावर सत्ता मिळेल.
निवडणूक लढवताना आम्ही शत्रूला कमी लेखत नाही. काँग्रेस हा आमचा खरा प्रतिस्पर्धी आहे. शिवसेना-भाजपला शहरातील पुरोगामी जनता स्वीकारणार नाही. भाजपने एलबीटी रद्द करण्याचे टोल रद्द करण्याचे खंडपीठ करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते.
अद्याप एलबीटी पूर्णपणे बंद नाही. खंडपीठ झाले नाही, कारण सरकारने खंडपीठासाठी कोल्हापूरबरोबर पुण्याचीही शिफारस केली. त्यामुळे खंडपीठ रखडले, टोल अद्यापही चालूच आहे. त्यामुळे भाजपकडून काहीही झालेले नाही. टोलबाबत मूल्यांकनाची रक्कम ठेकेदार कंपनीला मान्य नाही व महापालिकेवर कोणताही बोजा न पडता टोल रद्द व्हावा ही कृती समितीची व आमचीही भूमिका आहे. याप्रमाणे झाले तर आम्ही त्यांचे स्वागत करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
वकिलांची फसवणूक
खंडपीठाबाबत कोल्हापूरच्या वकिलांची फसवणूक झाली आहे. वास्तविक वकिलांनी बेमुदत आंदोलन मागे घेतले नसते तर त्याच वेळी खंडपीठ झाले असते, असे मत मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation election