दापोली पंचायत समितीतील वर्चस्व धोक्यात
दापोली विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दाखवलेला हक्क आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची झालेली राजकीय कोंडी या पाश्र्वभूमीवर पक्षाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला जबरदस्त धक्का बसण्याचे स्पष्ट संकेत आहेत. आता हा वाद पंचायत समितीतील शिवसेनेची सत्ता जाण्यापर्यंत मजल मारणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. कदम आणि दळवी यांनी गद्दारीच्या मुद्द्यावरून एकमेकांना टीकेचे लक्ष्य केले असले तरी हद्ध निवडणूक परस्परांच्या निष्ठावंताची अग्निपरीक्षाच ठरणार आहे.
गद्दार विरूद्ध निष्ठावंत, असा संघर्ष शिवसेनत सुरू असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आणि भाजपने आपली ताकद वाढवण्याचा चंग बांधलेला आहे. नाराज दळवी समर्थकांनी त्यांचा हा उत्साह वाढवला आहे. मात्र हे संकेत मतदारांपर्यंत कितपत पसरतील, याचीच बेरीज-वजाबाकी राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये कुणबी समाजाच्या अस्मिता पुन्हा एकदा निर्णायक ठरणार असून अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांची सामाजिक ताकदच शिवसेनेचे आस्तित्व कायम टीकवण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीने कुणबी समाजाच्या बहुजन विकास आघाडीशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न आधीपासूनच केले असून काँग्रेस पण शेवटच्या क्षणी त्याच समझोत्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपासून दूर केलेली नाराज व्होटबँक’ या निवडणुकीतही त्यांच्यापासून दूरच राहण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या पर्यायाकडेच ते अधिकाधिक सरकण्याची चिन्हे आहेत. साहजिकच ही निवडणूक रामदास कदम, सूर्यकांत दळवी यांच्यासह अनंत गीते यांच्यासाठीही महत्त्वाची ठरणार आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा गटांत शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. यामध्ये हण्र आणि बुरोंडी या दोन गटांमध्ये भाजपची ताकद वाढली असून दोन्ही ठिकाणी शिवसेनेला बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे.
हण्र येथे भाजपचे केदार साठे आणि बुरोंडीत भाजपच्या स्मिता जावकर यांनी निर्माण केलेले आव्हान शिवसेना कशी परतवून लावणार याकडे सर्वाचे लक्ष आहे. या दोन्ही जिल्हा परिषद गटातील चार पंचायत समिती गणातही शिवसेनेला फटका बसण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
केळशी, पालगड आणि जालगाव या गटांत खूपच राजकीय गोंधळ असून येथे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काँटे की टक्कर’ होणार आहेय. या तिन्ही गटात आणि त्यातील सहा पंचायत समिती गणांत दळवी विरूद्ध कदम समर्थकांत राजकीय हमरीतुमरी उघडपणे होणार असून त्याचा फायदा कोणत्या पक्षाला बसणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
असोंड जिप गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार मुजीब रूमाणे यांच्या समावेशाने शिवसेनच्या अनंत करबेले यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. येथे कुणबी समाजाच्या व्होटबँकेच्या विभागणीवरच राजकीय गणितं आखली जात आहेत. दरम्यान, अशा राजकीय गोंधळात दापोली पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता येणार की राष्ट्रवादी व भाजप एकत्र येऊन सत्तेचा दावा करणार, या भविष्यकालीन अंदाजावरच सर्वाचे लक्ष वेधले आहे.