लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहिल्यानगर : महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियमअंतर्गत (२०२१) नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांची तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य संचलनालयाने दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या पथकाने नोंदणीकृत २३० पैकी २१५ रुग्णालयांची तपासणी केली आहे. त्यात त्रुटी आढळलेल्या व दोषी असलेल्या ३२ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही माहिती दिली. खासगी रुग्णालयांकडून महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियमांचे पालन होते किंवा नाही, याची खातरजमा या तपासणीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. रुग्णालयातून आकारण्यात येणारे शुल्क व इतर रुग्णालयीन सेवेचे शुल्क, दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागांत लावावे तसेच रुग्णहक्क संहिता रुग्णालयाच्या दर्शनी भागांत स्वच्छ अक्षरात लावली आहे का, याची प्रामुख्याने तपासणी करण्यात आली.

पथकाने केलेल्या तपासणीत चार रुग्णालयांकडे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले. तीन रुग्णालयांनी बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार परवाना नूतनीकरण केलेला नाही तर, दहा रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात दरसूची लावण्यात आलेली नाही. मंजूर खाटा व प्रत्यक्ष खाटा यात तफावत असलेली १० रुग्णालये आढळून आली आहेत. पाच रुग्णालयांमध्ये ‘बायोमेडिकल वेस्ट’ची व्यवस्था नसल्याचे तपासणीत समोर आले.

अशा एकूण ३२ रुग्णालयांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीसा बजावल्या आहेत. महिनाभरात त्यांनी त्रुटींची पूर्तता न केल्यास, त्यांचा रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

आरोग्य संचालनालयाने संपूर्ण राज्यात खासगी रुग्णालयांच्या तपासणीचे व हा तपासणी अहवाल महिनाभरात सादर करण्याचे आदेश दिले होते. ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांची जिल्हा परिषदेमार्फत तपासणी केली जात आहे. अहिल्यानगर शहरातील महापालिकेमार्फत तर पालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांची जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या यंत्रणेमार्फत तपासणी केली जाते आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation issues notice to 32 private hospitals in ahilyanagar city mrj