परभणी : शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरून वसमत रस्त्याकडे जाणार्‍या रस्त्यावर प्रशासकीय इमारतीच्या संरक्षण भिंतीलगत रात्रीतून बेकायदेशीररित्या अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत शनिवारी (दि.1) मनपा आयुक्तांनी पथक पाठवून ते अतिक्रमण हटविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रातोरात होणारे हे अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने हटवले असले तरी शहरातील अन्य ठिकाणच्या अतिक्रमणाबाबत काय असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. शहरातील प्रशासकीय इमारतीसमोर अशाच प्रकारे अगोदर टपरीवजा एक छोटे दुकान सुरू करण्यात आले, त्याबाजूला एका रात्रीत थेट रस्त्यालगतच बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू करीत जागा हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही जागरूक नागरिकांनी मोबाईलवर त्याचा व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर व्हायरल केला. त्यानंतर मनपा सहाय्यक आयुक्तांनी नागरिकांच्या तक्रारी व भावनांची दखल घेत घटनास्थळी लगेच पथक पाठवून ते अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. नागरिकांच्या जागरूकतेमुळे हे अतिक्रमण वेळीच हटविण्यात यश आले आहे.

शहरातील सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांवर सध्या अतिक्रमणे झालेली आहेत तर काही ठिकाणी फेरीवाल्यांनी रहदारीचे रस्तेही काबीज केले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. सार्वजनिक व मोकळ्या जागेवर सुरुवातीला टपरीच्या माध्यमातून थोडासा आडोसा निर्माण करायचा आणि कोणाचेही लक्ष नाही असे पाहून रातोरात त्या ठिकाणी अतिक्रमण उभे करायचे या प्रकारे सध्या शहरात अनेक भागात अतिक्रमण केले जात आहे. शहरातील जिंतूर रस्ता, गंगाखेड रस्ता, वसमत रस्ता, पाथरी रस्ता या सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. महानगरपालिका या संदर्भात काय कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांतून विचारल्या जात आहे.