मुंबई, ठाणेसह राज्यातील १० महत्त्वाच्या महापालिकांमधील निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी (आज) दुपारी जाहीर होणार आहे. चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून फेब्रुवारीमध्येच निवडणुका होतील असे स्पष्टीकरण आयोगाने यापूर्वीच दिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत १० महानगरपालिका आणि २६ जिल्हा परिषदांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती आणि सोलापूर या १० महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहे.  महापालिकेसोबत २६ जिल्हा परिषदांमधील निवडणुकीचा कार्यक्रमही आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणा, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे.

मार्चमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा असल्याने महापालिका निवडणुका फेब्रुवारीतच घेतल्या जातील. त्याची तयारी सुरू असून प्रशासकीय अधिकारी, महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज.स. सहारिया यांनी रविवारी सांगितले होते.

राज्यात चार टप्प्यांमध्ये झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये नोटाबंदी, मराठा समाजाचे मोर्चे अशा मुद्दय़ांमुळे विरोधी वातावरण असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे आता आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आत्मविश्वासाने सामोरे जाईल. सत्ताधारी पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फायदा होतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्याप्रमाणे भाजपला यश मिळाले. पण महापालिका निवडणुकीत भाजपसमोर शिवसेनेचे प्रमुख आव्हान असेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal election 2017 bmc thane poll schedule state election commission press conference