मोहनीराज लहाडे
महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी; शिवसेनेतही गळतीमुळे आयात, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुसवेफुगवे
अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्याने आता रणधुमाळीने चांगलाच वेग घेतला आहे. सर्वच पक्षांनी तोडफोडीची रणनीती अवलंबत उमेदवारी दिली आहे. त्यात सर्वात आघाडीवर आहे तो भाजप. त्यानंतर शिवसेना. काहीही करून सत्ता ताब्यात घ्यायचीच, असे हे प्रयत्न आहेत. त्यातून भाजप ‘असंगाशी संग’ करू लागला आहे. पक्षातील निष्ठावंत त्यामुळे प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. काहींनी ‘राजीनामास्त्र’ उपसले. मात्र प्रदेश पातळीवरूनच पाठिंबा असल्याने निष्ठावंतांची अवस्था ‘तोंड दाबून..’ अशी झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या निवडणूक कोअर कमिटीच्या बैठकीनंतर स्थानिक भाजप नेते अधिक आक्रमक रणनीती अवलंबू लागले आहेत. त्यातून साधनशुचिता गुंडाळून ठेवली जात असली तरी विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाही सुरुंग लावला गेला आहे. भाजपच्या या हालचालींना राष्ट्रवादीकडूनही अप्रत्यक्ष साथ मिळाली. या साथीमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार विरुद्ध विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यातील पारंपरिक वादाची व आगामी लोकसभा निवडणुकीच्या नगर दक्षिणच्या जागेच्या वादाची बीजेही आहेत. काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आता या निवडणुकीतून अंग काढून घेतले आहे, तर जलसंधारण तथा पालकमंत्री राम शिंदेही जेमतेमच भूमिका निभावताना दिसत आहेत.
१७ प्रभागांतील ६८ जागांसाठी तब्बल ७१५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाला सर्व जागांवर उमेदवार उभे करता आलेले नाहीत. भाजपने जरी सर्व जागांवर उमेदवार उभे केले असले तरी त्यातील बहुसंख्य पक्षाबाहेरचेच आहेत. सांगली व जळगावमध्ये भाजपने हेच धोरण स्वीकारले होते. दुहेरी हत्याकांडाने राज्यभर गाजलेले शहरातील केडगाव उपनगर काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तेथेच भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. अर्ज दाखल करण्याच्या ऐन शेवटच्या क्षणी काँग्रेसमधून पाच उमेदवार आयात केले. त्यासाठी ‘आधी उमेदवारी नंतर पक्षप्रवेश’ असा अफलातून प्रकारही केला. निवडणूक कोअर कमिटीतून लांब ठेवलेले भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी त्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांच्या सर्वपक्षीय सोयरिकीचे संबंध त्यासाठी उपयोगात आले. मात्र त्यातून भाजप असंगाशी संग करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आयात केलेले पाचही उमेदवार खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले भानुदास कोतकर याचे समर्थक आहेत. त्यातून उपनगरात कोतकरविरुद्ध संघर्ष करणारे जुने भाजप पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत.
शिवसेनेने केवळ ५० उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यातही पक्षाबाहेरून आलेले अनेक आहेत. ‘एबी’ फॉर्मसह उमेदवार पळून गेल्याचा प्रकार यंदाही पक्षात घडला. पक्षाचे वरिष्ठ नेते ‘अयोध्या वारी’च्या तयारीत अडकल्याने स्थानिक पदाधिकारी खिंड लढवत आहेत. उमेदवारांची यादी जाहीर करताना शिवसेनेने अचानक भूमिका बदलत भाजपशी युती करण्यास तयार असल्याचे सांगण्यास सुरुवात केली होती. त्यामागे पक्ष सोडणाऱ्यांना अटकाव बसावा असाच हेतू होता.
भाजप व शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी-भाकप-युनायटेड रिपब्लिकन पक्ष यांची आघाडी तयार झाली. जागा वाटपात काँग्रेसला केवळ २५ जागा (त्यातील तीन जागा भाकपला) मिळाल्या. राष्ट्रवादीकडे ४३ जागा (त्यातील तीन यूआरपी) आल्या. काँग्रेसने निवडणूक समन्वयकपदी युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची नियुक्ती केली. त्यांनी विधानसभेची मागील निवडणूक नगर शहरातून लढवली होती. परंतु ते जागा वाटपाच्या चर्चेतून व एकूणच निवडणुकीपासून दूर आहेत. त्यामुळे आतापर्यंत ग्रामीण भागात नेतृत्व करणारे, लोकसभेच्या नगर दक्षिणच्या जागेसाठी इच्छुक असणारे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्याकडे नगर शहरातील पक्षाची सूत्रे सोपवण्यात आली व प्रदेश काँग्रेसने नगरमधील जागावाटप चर्चेचे अधिकार त्यांच्याकडे दिले. काँग्रेसला गेल्या वेळच्या तुलनेत १० जागा कमी मिळाल्याने पक्षात नाराजीचा सूर आहे. विखे यांनी इन्कार केला असला तरी कमी जागा स्वीकाराव्या लागल्याचा संबंध लोकसभेसाठी इच्छुक असल्याशी जोडला जात आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व अरुण जगताप व संग्राम जगताप या आमदार पितापुत्रांकडे आहे. नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे आहे. ती डॉ. सुजय विखे यांच्यासाठी काँग्रेसला हवी आहे. त्यातून दोन्ही पक्षांत वादंग निर्माण झाले आहे. राज्यपातळीवर आघाडीची या दोन्ही पक्षांत चर्चा सुरू असतानाच या जागेसाठी शरद पवार यांनी आ. अरुण जगताप यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले. म्हणजे मनपाच्या जागा वाटपाच्या चर्चेत लोकसभेसाठी इच्छुक असलेले दोन उमेदवार समोरासमोर होते. भाजपने केडगाव उपनगरातील काँग्रेसचे उमेदवार आयात केले. काँग्रेसने ऐनवेळी धावाधाव करत त्यांच्या जागी पर्यायी उमेदवार दिले, मात्र राष्ट्रवादीने तेही न दिल्याने भाजपच्या धक्कातंत्रात राष्ट्रवादीही सहभागी असल्याचे चित्र निर्माण झाले. कर्डिले यांची काँग्रेसमधील कोतकर व राष्ट्रवादीतील जगताप कुटुंबांशी सोयरिक असल्याचा उपयोग भाजपने करून घेतला.
कुटुंबात उमेदवारी
नेत्यांच्या घरात, कुटुंबात उमेदवारी देण्याचे धोरणही पक्षांनी स्वीकारले आहे. भाजपचे आमदार कर्डिले यांनी केडगावमधून पक्षाला उमेदवार आयात करून दिले, मात्र त्यांच्यात दोन विवाहित मुली राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यातील एक कन्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पत्नी आहे. भाजपचे खासदार, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांचा मुलगा व सून अशा दोघांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या मुलालाही उमेदवारी देण्यात आली आहे. खैरे कुटुंबातील तीन चुलतभाऊ तीन वेगवेगळ्या पक्षातून एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. काही विद्यमान नगरसेवकांच्या पत्नीलाही उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्यासमवेत त्यांच्या पत्नीही रिंगणात आहेत.
नेते, पदाधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
मनपा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ४८१ जणांवर तडीपार, स्थानबद्धतेचे प्रस्ताव तयार केले आहेत. त्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा व पदाधिकाऱ्यांचा, उमेदवारांचा समावेश आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, जि.प. माजी सदस्य सचिन जगताप, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड व त्यांचा मुलगा नगरसेवक विक्रम राठोड, भाजप खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव व नगरसेवक सुवेंद्र गांधी, महापौरांचे पती संभाजी कदम, माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक किशोर डागवाले आदींचा त्यात समावेश आहे. केडगावच्या दुहेरी हत्याकांडासंबंधित तीन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात आरोपी असलेले बहुतांश जण यात आहेत. काही दिवसांपूर्वी मोहरम व गणेश विसर्जन मिरवणूक एकत्रित झाली. त्या काळातही पोलिसांनी अशीच कठोर कारवाई केली होती. त्यामुळे या दोन्ही मिरवणुका एकाच दिवशी होऊनही वेळेत व शांततेत पार पडल्या. तीच भूमिका आता पोलिसांनी घेत हे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठवले आहेत. त्याच्या सुनावणीसाठी नोटिसाही बजावल्या गेल्या आहेत. अनेक उमेदवारांवर त्याची टांगती तलवार आहे.