वाई : साताऱ्यातील राजवाडा परिसरातील फळविक्रेत्यांचे अतिक्रमण पालिका व पोलिस प्रशासनाकडून हटविण्यात आले. प्रदीर्घ कालावधीनंतर या वास्तूने व परिसराने मोकळा श्वास घेतल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या साताऱ्यातील राजवाडा परिसरात फळविक्रेत्यांचे मोठे अतिक्रमण होते ते पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काढले. सातारा पालिकेच्या वतीने राजवाडा बसस्थानकाच्या मागे भाजी मंडई व फ्रुट मार्केटची उभारणी करण्यात आली आहे. या इमारतीचा पहिला मजला भाजी विक्रेत्यांना, तर दुसऱ्या मजल्यावर फळविक्रेत्यांना स्थलांतरित करण्याचा ठराव करण्यात आला. विक्रेत्यांना सोडत पद्धतीने जागावाटपही करण्यात आले. फळविक्रेत्यांकडून दुसऱ्या मजल्यावर काही दिवस व्यवसाय करण्यात आला. खरेदीसाठी ग्राहक येत नसल्याचे कारण देत फळविक्रेते इमारतीतून पुन्हा रस्त्यावर आले. ऐतिहासिक राजवाडा इमारतीला लागून काही फळविक्रेत्यांनी व्यवसाय सुरु केला. मागील अनेक वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे.

आणखी वाचा-गुप्तधनाचा दावा करणाऱ्या भोंदू बाबाला पोलादपूर येथून अटक, सातारा शहर पोलिसांची कामगिरी

मात्र, राजवाड्यासह रस्त्यावरील हातगाड्यांचे अन्यत्र स्थलांतर करावे, अशी मागणी सातत्याने नागरिकांमधून पुढे येत होती. अखेर पालिका व पोलिस प्रशासनाकडून ही बाब गांभीर्याने घेत राजवाडा वास्तूला लागून असलेल्या सर्व फळविक्रेत्यांचे अतिक्रमण काढून ही वास्तू अतिक्रमणातून मोकळी केली. अनेक वर्षांनंतर हा राजवाडा अतिक्रमणमुक्त झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

राजवाड्यासमोर फळे विक्रेत्यांची अतिक्रमणे काढली आहेत. राजवाडाभोवतालचा परिसर तसेच मोती चौक ते ५०१ पाटी हा रस्ताही नो हॉकर्स झोन केला जाणार आहे. त्याबाबत सभेत ठराव घेतला जाईल. पारंगे चौकातील अतिक्रमणेही दि. ३० रोजी काढणार आहोत. -अभिजीत बापट, प्रशासक तथा मुख्याधिकारी, सातारा.