सातारा : सातारा जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या आर्थिक व सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांच्या अर्थसाहाय्याच्या गरजा विचारांत घेऊन अनेकविध योजना राबविल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ भागातील शेतकरी, सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत झालेली आहे. सातारा जिल्हा बँकेचे कामकाज देशातील जिल्हा बँकांमध्ये आदर्शवत असल्याचे केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
मोहोळ यांची सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, शिवरूपराजे खर्डेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सहकार मंत्रालय, दिल्ली येथे बँकेच्या अडीअडचणीच्या अनुषंगाने नुकतीच भेट घेतली.
खा. नितीन पाटील म्हणाले, की शेतकरी सभासदांना केंद्र आणि राज्य शासनामार्फत जे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होते. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ३ टक्के आणि केंद्र शासनामार्फत ३ टक्के व्याज सवलत उपलब्ध केली जाते. केंद्र शासनाकडून व्याज परतावा देताना ऊस पीक कर्जाचा परतफेड कालावधी ३६५ दिवसांचा ग्राह्य धरला जातो.
वास्तविक ऊस पिकाची सर्वसाधारण १७-१८ महिने कालावधीनंतर तोडणी होते. त्यामुळे त्याची ३६५ दिवसांनंतर परतफेड होत नाही. त्यामुळे ३६५ दिवसांच्या वर परतफेड करणारे शेतकरी केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या ३ टक्के व्याज परताव्यापासून वंचित राहत आहेत. यासाठी परतफेड कालावधी ३६५ दिवसांऐवजी पिकाच्या उत्पादनाशी निगडित म्हणजे १७ ते १८ महिन्यांचा करण्यात यावा, अशी मागणी केली.
या वेळी नितीन पाटील यांनी बँकांच्या अडचणी मांडल्या. शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने पीक कर्ज देताना बँकांचे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकार १.५० आणि राज्य सरकार २.५० टक्के व्याज सवलत देते. केंद्र सरकारकडून मिळणारा व्याज परतावा कमी असल्याने बँकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे जिल्हा बँकांना पूर्वीच्या धोरणानुसार केंद्र सरकारकडून १.५० टक्क्यांऐवजी २ टक्के व्याज सवलत उपलब्ध व्हावी.
या वेळी मोहोळ यांनी, सहकारी बँकांचे देशाच्या ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे. सहकार क्षेत्र संपूर्ण देशातच चांगले काम करीत आहे; परंतु, सहकारी बँकांसमोर काही आव्हानेही आहेत. सहकार क्षेत्राची वाढ देशात मोठ्या प्रमाणात होत आहे. बँकेच्या सर्व अडीअडचणी, नाबार्ड व केंद्र शासनाच्या धोरणांबाबत जिल्हा बँकांना येणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा केली. या वेळी सातारा जिल्हा बँकेचे कामकाज देशातील जिल्हा बँकांमध्ये आदर्शवत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या वेळी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा मांडला.