अलिबाग- रसायनी येथे २०१८ मध्ये झालेल्या एका हत्याकांडातील आरोपींना सहा वर्षांनंतर जेरबंद करण्यात रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या प्रकरणात दोन आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले आहे. ओमकार सुनिल शिंदे, रोहीत विष्णू पाटील अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी हे उच्चशिक्षीत आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१३ एप्रिल २०१८ रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टावणे गावाजवळ एका नाल्यात जयेश काशीनाथ खुडे यांचा मृतदेह आढळून आला होता. अतिशय निर्घूणपणे त्यांची हत्या करण्यात आली होती. गेली सहा वर्ष त्यांचे मारेकरी मोकाट होते. रसायनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी भादवी कलम ३०२ अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपी सापडत नसल्याने गुन्हा तपासावर ठेऊन न्यायालयात अ समरी अहवाल सादर करण्यात आला होता. पण आरोपी सापडत नव्हते.

हेही वाचा >>> राज ठाकरे महायुतीत येणार का? छगन भुजबळ म्हणाले, “चांगली गोष्ट ही आहे की..”

दरम्यान हीबाब लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक समोनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी जिल्ह्यात उकल न झालेल्या खुनाच्या गुन्ह्यासाठी एका विशेष पथकाची नेमणूक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख बाळासाहेब खाडे पथकाचे नेतृत्व करत आहेत. त्यानुसार उकल न झालेल्या खुनाच्या गुन्ह्यांचा नव्याने तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केला होता.

मात्र गुन्हा घडून प्रदिर्घ काळ लोटल्यामुळे आरोपींचा शोध घेणे आव्हानात्मक ठरत होते. तांत्रिक पुरावे गोळा करणे शक्य नव्हते, त्यामुळे तपास कौशल्याच्या जोरावार गुन्ह्याची उकल करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे कौशल्य पणाला लागले होते. गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने पोलीसांनी या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला. गुन्ह्याचे विविध पैलू तपासून पाहीले. त्यानंतर संशयित आरोपींना शोध घेऊन विचारपूस सुरू केली. यात ओमकार सुनील शिंदे आणि रोहीत विष्णू पाटील या दोघांची नावे समोर आली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली.

हेही वाचा >>> वसंत मोरे म्हणतात “मी थोडासा वेळ घेतोय, पण माझी वेळ… “

सुरवातीला दोघांनीही तपासात सहकार्य केले नाही. मात्र पोलीसी हिसका दाखवताच दोघांनी आपल्या काळ्या कृत्यांची कबूली दिली. किरकोळ वादातून दोघांनी जयेश खुडे याचा काटा काढल्याचे सांगितले. जयेश याचा काटा काढण्यासाठी फ्लिप कार्ट पोर्टलवरून सुरा मागवला. नंतर लिफ्ट देतो सांगत दोघे गाडीवर बसवून त्याला निर्जनस्थळी घेऊन गेले. तिथे त्याच्यावर सपासप सुऱ्याचे वार केले आणि मृतदेह नाल्यात टाकून दिला. आणि दोघे तेथून पसार झाले. गेली सहा वर्ष दोघेही मोकाट फिरत होते. पुराव्याअभावी पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरत होते. मात्र केवळ तपास कौशल्याच्या जोरावर, पोलीसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपींना गाठलेच.   या गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, सहाय्यक फौजदार राजेश पाटील, प्रसाद पाटील, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, संदीप पाटील, राकेश म्हात्रे,, सुधीर मोरे, तुषार घरत आणि अक्षय पाटील यांनी महात्वाची भुमिका बजावली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder accused arrest after six years by raigad local crime branch zws