अलिबाग : तब्बल सात वर्षानंतर महाड चांडवे येथील समोद शेडगे यांच्या खूनाची उकल करण्यात रायगड पोलीसांना यश आले आहे. खून करून अपघात असल्याचा बनाव करणाऱ्या आरोपीला रायगड पोलिसांनी जेरबंद केले आहे. राज्य मानवी हक्क आयोगाच्या निर्देशामुळे या गन्ह्याची उकल झाली आहे. ७ ऑगस्ट २०१६ रोजी समोद शेडगे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. महाड पंढरपूर मार्गावर अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने ही दुर्घटना घडल्याबाबतची नोंद करण्यात आली होती. मयताच्या पत्नीनेच याबाबत तक्रार दिली होती. त्यामुळे जुजबी तपास तांत्रिक पूर्तता करून पोलीसांनी या प्रकरणाचा तपास पोलिसांनी बंद केला होता.
मात्र या अपघातानंतर मयत समोद शेडगे यांची आई सरीता शेडगे यांनी या घटनेबाबत संशय व्यक्त केला होता. हा अपघात नसून घातपात असल्याची शंका त्यांना आली होती. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा या मागणीसाठी त्यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर राज्यमानवी हक्क आयोगाने पोलीसांना या प्रकरणात भादवी कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाख करून पोलीस तपासाचे निर्देश दिले. अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांची या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली.
यानंतर बंद झालेल्या तपासाला पुन्हा एकदा गती मिळाली. सुरुवातीला पोलीसांनी तांत्रिक तपासावर भर दिला. नातेवाईकांचे फेर जबाब नोंदवले, शवविच्छेदन अहवालाची जे. जे. रुग्णालयाच्या पथकाकडून फेरतपासणी करून त्यांची निरीक्षणे नोंदवून घेतली. मयत समोद शेडगे यांच्या मोबाईल फोनचा शोध सुरू केला. सात वर्षांपासून हरवलेला शेडगे यांचा फोन पोलीसांनी तांत्रिक तपास करून शोधून काढला. यानंतर गुन्ह्याचे धागेदोरे सापडत गेले. कौशल्यपूर्ण तपास करून साक्षीदारांकडून माहिती संकलित केली. यातून संदीप नामदेव कळंबे यांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले. अनैतिक संबधातून आरोपीने हा खून केल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा >>> “मनोज जरांगेंची ‘ती’ मागणी चुकीची”, ओबीसी महापंचायतीकडून महामोर्चाचा इशारा
गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकलही पोलीसांनी जप्त केली. अशा प्रकारे सात वर्षापुर्वीच्या खूनाचा उलगडा झाला. पोलीसांनी आरोपी संदीप नामदेव कळंबे याला अटक केली असून, या प्रकरणातील मयताच्या पत्नीचाही समावेश आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासात अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती अंधळे, सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के, विक्रांत फडतरे, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार संजय साळवी, अरुण घरत, सागर अष्टमकर, अभियंती मोकल यांनी महत्वाची भुमिका बजावली.