लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर: रात्री जेवण करून रस्त्यावर शतपावली करीत असताना एका निलंबित सहायक पोलीस निरीक्षकाचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार हत्याराने हल्ला करून निर्घृणपणे खून केल्याची घटना सांगोला तालुक्यात घडली. सूरज विष्णू चंदनशिवे (वय ४२) असे खून झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. सांगली येथील गुन्हे शाखेत पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना एका मोठ्या आर्थिक गुन्ह्यात निलंबित झालेले चंदनशिवे हे सांगोला शहरापासून जवळच असलेल्या स्वतःच्या वासूद गावात राहात होते. रात्री घरात जेवण करून वासूद-केदारवाडी रस्त्यावर शतपावली करण्यासाठी गेले असताना तेथे दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून चंदनशिवे यांच्या तीक्ष्ण हत्याराने खून केला.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता सकाळी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात चंदनशिवे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आणखी वाचा-गौतमी पाटील गोंधळ घालणाऱ्यांवर भडकली; म्हणाली, “ज्यांना दगडफेक करायची असेल त्यांनी…!”
फौजदार चंदनशिवे हे सांगलीत नेमणुकीस असताना एकामोठ्या आर्थिक गुन्ह्यात हस्तगत केलेल्या रकमेपैकी पोलिसांनी सुमारे नऊ कोटी रूपयांची रक्कम परस्पर हडप केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी निलंबित झाले होते. यात चंदनशिवे यांचाही समावेश होता. सध्या त्यांची नेमणूक सांगली पोलीस मुख्यालयात होती. त्यांचे थोरले बंधू मंत्रालयात सेवेत असून आई वासूद गावच्या सरपंच होत्या. चंदनशिवे कुटुंबीयांचा पंढरपूरजवळ दूध प्रकल्प आहे.