सोलापूर : घर जागेच्या वादातून तीन भावांमध्ये झालेले भांडण मिटविणे थोरल्या भावाच्या जीवावर बेतले. भांडणाचे पर्यवसान त्याच्या हत्येत झाले. थोरला मंगळवेढा तालीमजवळ सकाळी झालेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी मृताच्या भाऊ आणि भावजयीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी चौघांना अटक होऊन पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

शहाजहान गुलहमीद शेख (वय ५३) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा मुलगा सलीम शेख याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार मृत शहाजहान याचे भाऊ शाबीर गुलहमीद शेख (वय ४५), समीर गुलहमीद शेख (वय ४०) यांच्यासह भावजय मेहरून शाबीर शेख, रेहाना समीर शेख, पुतणे सुफियान साबीर शेख, साकिब शेख या सहाजणांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. दरम्यान, समीर शेख याने दिलेल्या फिर्यादीनुसार मृत शहाजहान शेख, त्याचा मुलगा सलीम शेख, शाहिद शेख, आतिफा सलीम शेख, सुलताना शेख, शाकीर शेख अशा सहाजणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद झाला आहे.

हेही वाचा >>>Non Creamy Layer Income Limit : नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्यासाठी राज्याची केंद्राकडे विनंती; ओबीसींना दिलासा मिळणार का?

शेख कुटुंबीयांत घर जागेच्या वाटणीचा वाद होता. मृत शहाजहान हा दौंडमध्ये कुटुंबीयासह वास्तव्यास होता. इकडे जागेचा वाद मिटविण्यासाठी आणि घरातच सख्ख्या भाचीच्या लग्न सोहळ्याची तयारी करण्यासाठी शहाजहान कुटुंबीयासह आला होता. परंतु जागेचा वाद मिटवताना भांडण विकोपास गेले. यात वाद सोडवणे शहाजहान याच्या अंगलट आले. दोघे भाऊ, भावजयींसह पुतण्यांनी लाकडी बॅट, दांडक्यांनी शहाजहान व त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला. डोक्यास जबर मार लागल्याने शहाजहान गंभीर जखमी होऊन मरण पावला.

पोलिसांनी मृत शहाजहानचा भाऊ साबीर शेख, त्याची पत्नी मेहरून यांच्यासह पुतणे साकी आणि सुफियान या चौघांना अटक केली. त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पोलीस निरीक्षक विकास देशमुख हे पुढील तपास करीत आहेत.