सोलापूर : दारूच्या नशेत घरात आई-वडिलांना नेहमीच त्रास देणाऱ्या थोरल्या भावाचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी धाकट्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. सांगोला तालुक्यातील चिंचोळी गावात ही घटना घडली.

कार्तिक नामदेव यादव (वय २८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा धाकटा भाऊ तुषार (वय २४) यास पोलिसांनी अटक केली असून, त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे.

याबाबत मृत कार्तिकचे वडील नामदेव रावसाहेब यादव (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपली पत्नी नंदा हिच्यासह कार्तिक व तुषार यांच्या सोबत एकत्र राहतात. थोरला मुलगा कार्तिक हा काहीही कामधंदा न करता दररोज दारू पिऊन त्रास देत होता. विशेषतः आई नंदा आणि वडील नामदेव यांना वारंवार दारूच्या नशेत शिवीगाळ, मारहाण करून त्रास देत असल्याने त्यास सारेजण वैतागले होते. धाकटा भाऊ तुषार हा त्याच्यावर चिडून होता.

याच कारणावरून चिंचोळी गावच्या हद्दीत शिवरत्न पेट्रोल पंपासमोर मनोहर नामदेव घाडगे यांच्या शेतातील रस्त्याच्या बाजूला विहिरीच्या भरावाजवळ सकाळी पावणेअकराच्या सुमारास कार्तिक आणि तुषार हे दोघे भाऊ एकमेकांना भिडले. त्या वेळी तुषार याने कार्तिक यास, तू वारंवार दारू पिऊन आई-वडिलांना का त्रास देतोस, असा विचारत त्याच्यावर चाकूने हल्ला केला. छातीखाली डाव्या बाजूला बरगडीवर चाकूने भोसकल्याने त्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.